नाशिक : दोन फुटलेल्या पक्षांमध्ये काँग्रेसची कोंडी आणि ठाकरे गटाने काढली पवार गटाची दांडी!!, हा खरं म्हणजे मुंबईच्या हॉटेल ट्रायडेंट मध्ये झालेल्या 7 तासांच्या महाविकास आघाडीच्या बैठकीचा राजकीय निष्कर्ष आहे. MVA loksabha elections formula, Congress in a fix between two split parties, thackeray kicked pawar faction to third position!!
महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 जागांचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी हॉटेल ट्रायडेंट मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची मॅरेथॉन बैठक झाली. मात्र या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन प्रमुख नेतेच उपस्थित नव्हते. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे नेते या बैठकीला उपस्थित होते. या सर्व नेत्यांमध्ये तब्बल 7 तास चर्चा झाली सकाळी 11.00 वाजता सुरू झालेली चर्चा साधारण सायंकाळी 6.30 नंतर संपली.
महाराष्ट्राच्या सर्व 48 जागांचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. आमच्यात सविस्तर चर्चा झाली. भाजपने दावा केला तसे कुठलेही आमच्यात भांडण झाले नाही. उलट डाव्या पक्षांना, प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला आणि राजू शेट्टींच्या पक्षाला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा आम्ही निर्णय घेतला, असे संजय राऊत म्हणाले. पण या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित नव्हते ही बाब अधोरेखित करण्यासारखी ठरली.
पण त्याही पेक्षा या बैठकीत महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला ठरला, त्यानुसार महाराष्ट्रात ठाकरे गट लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढवेल, त्या खालोखाल काँग्रेस आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल, असे स्पष्ट झाले. याचा अर्थच दोन फुटलेल्या पक्षांमध्ये काँग्रेसची कोंडी झाली आहे.
वास्तविक आज तरी (26 जानेवारी 2024) काँग्रेस महाराष्ट्रात अखंड आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष उभे फुटले आहेत. ठाकरे आणि पवारांना त्यांचे बहुसंख्य आमदार सोडून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला निघून गेले आहेत. तसे आज तरी काँग्रेसचे झालेले नाही. त्यामुळे अर्थातच विधानसभेतले विरोधी पक्ष नेते पद राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला न मिळता, ते काँग्रेसला द्यावे लागले.
अशा स्थितीत महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीत काँग्रेसचा पहिला क्रमांक ठरेल, त्या पाठोपाठ संख्याबळाच्या आधारे शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दुसरा नंबर ठरेल आणि शरद पवार कितीही “बलाढ्य” नेते मानले गेले असले, तरी त्यांची राष्ट्रवादी तिसऱ्याच क्रमांकाचा पक्ष ठरेल, असा फॉर्म्युला काँग्रेसला अपेक्षित होता. पण प्रत्यक्षात ठाकरे गटाने बाजी मारत आपल्या पदरात जास्त जागा पाडून घेतल्या आणि काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. ठाकरे गट आणि काँग्रेसच्या या संघर्षात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर घसरली. ही एक प्रकारे ठाकरे गटाने पवार गटाची काढलेली दांडीच ठरली!!
उद्धव ठाकरेंचा पक्ष जरी फुटला असला तरी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने दंड थोपटून उभे राहिले आहेत. ते शरद पवारांसारखी “नुरा कुस्ती” खेळण्याच्या मन:स्थितीत नाहीत. उद्धव ठाकरे यांची जी काही लढाई आहे, ती समोरून आहे. पवारांसारखी पाठीमागून खेळण्याची त्यांची पद्धत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ बहुसंख्य आमदार निघून गेले असले तरी उद्धव ठाकरेंच्या पाठीराख्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. नाशिक मध्ये झालेल्या अधिवेशनात ते स्पष्ट दिसून आले.
त्या तुलनेत शरद पवारांच्या पाठीराख्यांची संख्या फारच घटली आहे. शिवाय शरद पवारांच्या भूमिकेविषयी म्हणजेच विश्वासार्हतेविषयी कोणालाच खात्री नाही. त्यामुळे पवारांच्या बाजूला नेमके किती आमदार??, किती नेते आणि किती कार्यकर्ते उरलेत??, याविषयी खुद्द पवार गटातच दाट शंका आहे. त्यामुळे शरद पवारांची प्रतिमा “बलाढ्य” नेत्याची असली, तरी प्रत्यक्षात त्यांची राष्ट्रवादी मात्र फुटलेल्या शिवसेनेपेक्षा आणि अखंड काँग्रेस पेक्षा फारच कमकुवत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाने त्यांना महाविकास आघाडी तिसऱ्या क्रमांकावर ढकलून दिले आहे.
अर्थातच महाविकास आघाडीत दोन फुटलेल्या पक्षांमध्ये काँग्रेसची कोंडी झाली आहे, पण मधल्या मध्ये ठाकरे गटाने पवार गटाची दांडी काढली आहे, असेच म्हणावे लागेल!!
MVA loksabha elections formula, Congress in a fix between two split parties, thackeray kicked pawar faction to third position!!
महत्वाच्या बातम्या
- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांनी अनुभवला अयोध्येतला अनुपम्य सोहळा, वाचा त्यांच्याच शब्दांत!!
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत
- शिवराज्याभिषेकच्या ३५० व्या महोत्सवानिमित्त कर्तव्य पथावर झळकणार
- भीषण दुर्घटना! 65 युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन जाणारे रशियन लष्करी विमान कोसळले