विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा तीव्र शब्दांत हल्ला चढवला असून, “४२ परदेश दौरे केले. मात्र मोदींनी आजवर एकदाही हिंसाचाराने पोखरलेल्या मणिपूरला भेट दिली नाही,” असा आरोप केला आहे. Mallikarjun Kharge
खर्गे म्हणाले, “मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंसाचार, जातीय संघर्ष, महिला अत्याचार आणि विस्थापनाच्या घटनांनी जनतेचे जीवन उध्वस्त झाले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे एकदाही जाऊन जनतेचा आवाज ऐकण्याची तसदी घेतलेली नाही. परदेशात गेले तरी फोटोसेशन करतात, मात्र देशातील एक राज्य अशांत असताना त्याकडे पाठ फिरवतात.”
यावेळी खर्गे यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यावर संविधान बदलण्याचा आरोपही केला. “भाजप आणि आरएसएस हे दोघेही भारताचे संविधान संपवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या अजेंड्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कांना पायदळी तुडवणे हे आहे. त्यांना सामाजिक न्याय नको आहे. त्यामुळे ते संविधान बदलण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत,” असे खर्गे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना खर्गे म्हणाले, “तुम्ही संसदेत प्रवेश करताना संविधानाला नमन केले होते. तुम्ही संविधानामुळेच पंतप्रधान बनलात. पण आता तुम्हीच त्याच संविधानाला संपवू पाहत आहात. हे देश खपवून घेणार नाही.”
खर्गे यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देत राहील. “संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि तो कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. जनता जागृत आहे. ती तुमच्या कटकारस्थानांना यशस्वी होऊ देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
Modi visited 42 countries, but never went to Manipur”; Mallikarjun Kharge slams
महत्वाच्या बातम्या
- बरोबरच आहे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीस कशाला लिहून देतील??, पण…
- India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार
- Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले
- पडळकरांच्या मुद्द्यावरून पत्रकारांनी फडणवीसांना छेडले; पण अजितदादांना शेजारी बसवून फडणवीसांनी आव्हाडांचेही वाभाडे काढले!!