कुवेतमध्ये पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर शनिवारी कुवेत सिटी येथे पोहोचले. येथे त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी 101 वर्षीय माजी IFS अधिकारी मंगल सैन हांडा यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी कुवेत राज्याचे अमिर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून कुवेतच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. चार दशकांनंतर कुवेतमध्ये भारतीय पंतप्रधान आले आहेत. 43 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी 1981 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कुवेतला भेट दिली होती.
यावेळी भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘तुम्हा सर्वांकडे बघून जणू काही इथे मिनी इंडियाचा उदय झाला आहे. सध्या तुम्ही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या तयारीत व्यस्त असाल. मी तुम्हा सर्वांना ख्रिसमस, नवीन वर्ष आणि देशाच्या कानाकोपऱ्यात साजरे होणाऱ्या सर्व सणांच्या शुभेच्छा देतो. ते म्हणाले, आज वैयक्तिकरित्या माझ्यासाठी खास क्षण आहे. याचे कारण म्हणजे 43 वर्षांनंतर म्हणजेच 4 दशकांहून अधिक काळानंतर एक भारतीय पंतप्रधान कुवेतला पोहोचला आहे.
तुम्हाला भारतातून इथे यायला ४ तास लागतात, पण एका भारतीय पंतप्रधानाला इथे यायला ४ दशके लागली. मोदी म्हणाले की, तुमचे अनेक मित्र पिढ्यानपिढ्या कुवेतमध्ये राहत आहेत. अनेकांचा जन्मही येथे झाला. दरवर्षी शेकडो भारतीय इथे तुमच्या ग्रुपमध्ये सामील होतात. कुवेतच्या कॅनव्हासला तुम्ही भारतीयत्वाचा रंग दिला आहे. अशा परिस्थितीत आज मी फक्त तुम्हाला भेटण्यासाठी नाही तर तुमच्या सर्वांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी येथे आलो आहे.
मोदी म्हणाले की, येत्या काही दशकात आपण आपल्या समृद्धीचे मोठे भागीदार असणार आहोत. आमचे उद्दिष्ट वेगळे नाही. कुवेतचे लोक नवीन कुवेत निर्माण करण्यात व्यस्त आहेत. भारतातील लोकही २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यात गुंतले आहेत. भारतामध्ये जगातील कौशल्याची राजधानी बनण्याची क्षमता आहे.