नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरच्या रेशीम बागेमध्ये डॉ. हेडगेवार स्मृती स्थळावर जाऊन संघ प्रेरणेच्या गोष्टी सांगितल्या, पण इंग्रजी आणि मराठी माध्यमांनी त्याचे रिपोर्टिंग मात्र डाव्या विचारांच्या सुस्तीतूनच केले. 2025 च्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संघ शताब्दीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीम बागेतल्या डॉ. हेडगेवार स्मृती स्थळावर पोहोचले. तिथे त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. पंतप्रधान या नात्याने मोदी प्रथमच संघ स्थानावर पोहोचले होते. त्यामुळे माध्यमांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमांनी त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने रिपोर्टिंग केले, पण त्यामध्ये माध्यमांची डाव्या विचारांची सुस्ती दिसली.
वास्तविक पंतप्रधान आणि गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्याच्या आधी मोदी संघाचे प्रचारक होते, त्यादरम्यान असंख्य वेळा ते रेशीम बागेत गेलेच होते. तिथे त्यांनी निवास देखील केला होता. पण मोदींचा आजचा दौरा संघ आणि भाजप यांचे मतभेद मिटवण्यासाठी उपयुक्त ठरला, अशी मखलाशी इंग्रजी. माध्यमांनी केली. त्यांचे अनुकरण मराठी माध्यमांनी केले पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा केली??, यावर दोन्ही माध्यमांनी “वैचारिक पतंग” उडवले. वास्तविक यासंदर्भामध्ये संघाचे मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर आणि संघ विचारक शेषाद्री चारी यांनी खुलेपणाने सगळे सांगितले होते. मोदी आणि भागवत हे राष्ट्रहिताशिवाय दुसऱ्या कुठल्या विषयांची चर्चा करणार नाहीत, असे ते म्हणाले होते.
पंतप्रधान मोदींनी सुद्धा माधव नेत्रालयाच्या शिलान्यास समारंभामध्ये संघ प्रेरणेच्या अनेक गोष्टी सांगितल्या. संघाच्या स्थापनेपासून ते संघाच्या शताब्दी पर्यंत संघाचा वटवृक्ष कसा फोफावला, डॉक्टरांनी आणि गोळवलकर गुरुजींनी कोणत्या ध्येयवादाने संघ स्वयंसेवकांना प्रेरणा दिली, या सगळ्या गोष्टी मोदींनी सविस्तर सांगितल्या. गोळवळकर गुरुजींनी संघाची तुलना प्रकाशाशी केली होती. प्रकाश स्वतः काही करत नाही, पण इतरांना सर्व कार्य करण्यासाठी प्रेरणा देतो. तो अंधकार हटवतो. चराचरामध्ये चैतन्य निर्माण करतो, तसेच काम संघ करतो, असे गुरुजी एका मुलाखतीत म्हणाल्याची आठवण मोदींनी सांगितली. पण मोदींच्या या भाषणाचे रिपोर्टिंग इंग्रजी माध्यमांनी मोदींनी संघाची स्तुती भागवतांच्या शेजारी बसून केली, अशा उथळ आणि पाणचट शब्दांनी केले. जणू काही मोदी आणि भागवत हे प्रथमच भेटत होते आणि त्यानंतर भेटणारच नाहीत, अशा आशयाची मखलाशी इंग्रजी माध्यमांनी केली, जी डाव्या विचारांची सुस्ती आल्याचे निदर्शक ठरले.
– भागवत – मोदी पदांच्या पलीकडले संबंध
वास्तविक मोदी आणि भागवत हे एकाच वयाचे. दोघांचेही जन्म 1950 सालातले. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचचे. मोदींचे मोहन भागवत यांच्या वडिलांपासून त्यांच्याशी निकटचे संबंध. त्यामुळे दोघांच्या संबंधांमध्ये, ते कुठल्या पदावर असणे आणि नसणे हा मुद्दाच खरं म्हणजे उपस्थित होत नाही. मोहन भागवत आणि मोदी यांना भेटायला ते केवळ सरसंघचालक आणि पंतप्रधान आहेत, असा संदर्भ देण्याचे कारण आणि औचित्यही नाही. कारण दोघांचेही संबंध कुठल्याही पदाशी संलग्न नाहीत, ते या सगळ्याच्या पलीकडले आहेत. पण याची साधी जाण देखील इंग्रजी माध्यमांच्या रिपोर्टिंग मध्ये नव्हती. अगदी संघ आणि भाजपमध्ये जर कुठले मतभेद असतील, तर ते सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिटवण्या इतपत मोठे आहेत का??, याचे साधे भान देखील इंग्रजी माध्यमांना आणि काही प्रमाणात मराठी माध्यमांना राहिले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या बातम्यांची शीर्षके PM Modi praise RSS for its nation building with Bhagwat by his side आणि Mohan Bhagwat by his side, PM Modi pays tributed to RSS stalwarts, inspire us to serve the nation!! अशा भाषेत केली. यातून त्यांची डाव्या विचारांची सुस्तीच उघड्यावर आली.
Modi RSS headquarters visit and left liberal English media reporting
महत्वाच्या बातम्या
- श्री तुळजाभवानी मंदिर – जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ होणार!
- CM Devendra Fadnavis विकासाची महागुढी उभारू या! राष्ट्रधर्म वाढवू या!
- Waqf bill विरोधात मुस्लिम संघटनांची NDA मध्ये सेंधमारी; चंद्राबाबू + नितीश कुमार आणि चिराग पासवान यांना दमबाजी!!