वृत्तसंस्था
अहमदाबाद : उत्तर प्रदेशसह चार राज्यात कालच विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर एकाही दिवसाचे विश्रांती न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पासून “मिशन गुजरात 2022” वर राज्यात दाखल झाले आहेत.
त्याच वेळी “राजकीय योगायोग” साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक आजपासूनच गुजरातच्या अहमदाबादेत सुरू झाली आहे. Mission Gujrat 2022 narendra modi in ahmedabad
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात मध्ये बर्याच दिवसांनी अहमदाबादेत रोड शो केला आहे. त्याला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. या रोड शो नंतर पंतप्रधान स्वतः गुजरातमधल्या वरिष्ठ भाजप नेत्यांची आणि पंचायत पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेत आहेत. यामध्ये गुजरात विधानसभेच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यात येईल. आजची ही पहिलीच बैठक आहे.
– संघाची प्रतिनिधी सभा
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक प्रतिनिधी सभा देखील अहमदाबाद मध्ये आज सुरू झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करून बैठकीला सुरुवात झाली आहे. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि प्रतिनिधी सभेचे सदस्य या बैठकीला उपस्थित आहेत.
– संघ विस्ताराचा अजेंडा
विशिष्ट राजकीय योगायोग असा की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या गुजरातच्या दौर्यावर आहेत. तशीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा देखील आजपासून दोन दिवस म्हणजे उद्यापर्यंत अहमदाबाद मध्ये होत आहे. कोविड प्रोटोकॉल मुळे संघाचा जाहीर कार्यक्रम होणार नाही तसेच प्रतिनिधींच्या संख्येवर ही मर्यादा घालण्यात आली आहे. परंतु या दोन दिवसांच्या बैठकीत संघाच्या संघटनात्मक विस्ताराचा विषय प्रामुख्याने चर्चिला जाणार आहे. पुढच्या वर्षभरातल्या संघ विस्तार हा मुख्य अजेंडा आहे.
गुजरात विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी आणि पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च प्रमुख सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे एकाच दिवशी एकाच वेळी गुजरातेत अहमदाबादेत आहेत आणि संपूर्ण वर्षभराचा कार्यक्रम हे ठरवत आहेत. हा विशिष्ट योगायोग बरेच काही राजकीय इंगित सांगून जात आहे.