आज मास्टर दीनानाथ यांचा स्मृतिदिन ! स्वर्गीय लता दीदी यांनी अवघ्या १४ व्या वर्षी हा प्रथम साजरा केला ! Mangeshkar award and irritation of hatred
त्यानंतर ८० वर्षे ही परंपरा चालू होती . आता त्या गेल्या आणि मंगेशकर परिवाराने लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार याच दिवशी द्यायचा असे ठरवले आणि मुंबईतील एका भावस्पर्शी कार्यक्रमात हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला!
वास्तविक हा मंगेशकर परिवाराचा कौटुंबिक कार्यक्रम !
या कार्यक्रमात कुणाला बोलवायचे ? कुणाला पुरस्कार दयायचा ? कुणाला सूत्रसंचालन सांगायचे ? पहिल्या रांगेत आणि शेवटच्या रांगेत कुणी बसायचे हा त्यांचा निर्णय असणे स्वाभाविक होते . निमंत्रण पत्रिकेत कुणाची नावे असावी हे पण तेच ठरवणार असे असताना काहींना कायमस्वरूपी द्वेषाची पोटदुखी झाली आहे त्यांना उलट्या सुरू झाल्या आणि त्या ट्विट करून सगळीकडे आपली घाणेरडी वृत्ती त्यांनी पसरवायला सुरुवात केली .
एक देखणा कार्यक्रम , स्वतः प्रधानमंत्री म्हणाले मी प्रेक्षकांत बसणार कारण सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून दिदींच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणार ! व्यासपीठावर कुणी नाही ! हरीश भिमानी यांचे सूत्रसंचालन ! मंगेशकर परिवाराचे मोजके बोलणे !
माननीय मोदीजी यांचा ताम्रपटातुन होणारा गौरवपूर्ण उल्लेख आणि त्यावेळी त्यांचा नम्रता व्यक्त करणारा मुद्राभाव बघण्यासारखा होता !
पण महाराष्ट्रात काही मंडळींना सत्तेचा आणि त्या अनुषंगाने अधिकाराचा एक वेगळाच अहंकार निर्माण झाला आहे . आपल्याकडे गावात लग्नपत्रिकेत किंवा सोहळ्यात गावचा सरपंच किंवा स्थानिक पुढारी याचा उल्लेख पाहिजेच ! एकवेळ मंगलाष्टक झाले नाही तरी त्याचे आशीर्वाद घेतलेच पाहिजे असा दंडक ! व्याही रुसला तरी चालेल पण पुढारी रुसला तर काही खरे नाही ही भीती ! आशा प्रकारची मनोवृत्ती गल्ली ते मुंबई जपणाऱ्या मंडळींनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोती वृत्ती दाखवलीच !
लता दीदीनी केलेले देशाच्या हितासाठीचे ट्विट जणू काही मोदीजी यांच्या पाठिंब्याचे ट्विट आहे असे समजून त्यांच्या विरुद्ध या लोकांच्या चेल्या चपाट्यानी दीदींचा भारतरत्न पुरस्कार परत घ्यावा म्हणून मोहीम चालवली . दीदी गेल्यानंतर सुद्धा हीच कोती वृत्ती त्यांनी दाखवली आणि आंतरराष्ट्रीय प्रवक्त्याने हृदयनाथ यांच्या सावरकर गीता मुळे नोकरीवर गदा आली या सत्यावर शंका व्यक्त केली . एव्हढे विकृत वागूनही आम्हाला बोलावले नाही म्हणून रुसायचे आणि ट्विट करत मुंब्रा निवासी विद्वानाने तारे तोडायचे हे जरा जास्तच होते आहे .
वास्तविक लतादीदी आणि एकूण मंगेशकर कुटुंबीय यांच्या हिंदुत्ववादी चळवळीशी , सावरकर यांच्याशी आणि काही प्रमाणात संघाशी असलेल्या जवळकी मुळे अनेक जण अस्वस्थ झाले आहेत . कला क्षेत्र हे ज्यांचे राखीव कुरण असल्यासारखे जे वागत होते त्यांना अलीकडच्या काळात अनेक धक्के बसत आहेत आणि त्यामुळे त्यांचे अस्वस्थ आत्मे बाल बुद्धीचे प्रदर्शन करत आहेत .
साहित्य संमेलन असो नाही तर नाट्य सम्मेलन ! महाराष्ट्रात आमच्याच साक्षीने सगळे झाले पाहिजे ! परस्परम् प्रशंसन्ती , अहो रुपम् अहो ध्वनी! या पद्धत्तीने कौतुक झाले पाहिजे असा अट्टाहास धरून अचानक मिळालेल्या सत्तेचा दर्प ज्या पद्धतीने व्यक्त केला जात आहे तो खूप चिंताजनक आहे . काही झाले की महाराष्ट्राची अस्मिता आणि अपमान अशी आरोळी ठोकत ओंगळवाणे प्रदर्शन या मंडळींनी थांबवले पाहिजे .
आदर हा कमवावा लागतो , तो सत्तेच्या आणि दडपशाहीच्या जोरावर विकत घेता येत नाही हे लक्षात ठेवणे संबंधितांनी गरजेचे आहे . ज्या सरस्वतीच्या साधिकेने आपल्या तपाच्या जोरावर भारताचे नाव साता समुद्रा पल्याड केले , ज्यांनी देशातील जास्तीत जास्त भाषेत गीत गाताना एकात्मतेची वीण घट्ट केली . ज्या संस्कृतीच्या वाहिकेने या संस्कृतीतील सर्व शाश्वत विचाराना आणि तत्वज्ञानाला गेयता प्राप्त करून दिली त्या दिदींना गेल्यानंतरही , त्यांच्या नावाने दिलेल्या पुरस्काराला अपशकुन करणाऱ्या मंडळींची नोंद केवळ महाराष्ट्र नाही तर समस्त भारत घेत आहे याची संबंधितांनी नोंद ठेवावी !
शेवटी हरीश भिमानी यांनी सांगितले तसे भगवत गीतेतील दोन श्लोक दिदींच्या जीवन कार्याची प्रेरणा होते आणि त्या म्हणायच्या या दोन श्लोकात मला मोदीजी यांचे जीवन दर्शन होते . सुमारे ४० वर्षाच्या भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा उलगडा होणारी एक संध्याकाळ ज्यांनी प्रत्यक्ष अथवा आभासी पद्धतीने अनुभवली त्यांना आशा अपशकुन करणाऱ्या लोकांच्या मुळे विचलित होण्याची आवश्यकता नाही . पंडित हृदयनाथ यांची आजारपणामुळे असलेली अनुपस्थिती चुटपुट लागून राहिली तरी एक हृद्य कार्यक्रम महाराष्ट्रातील जनतेने अनुभवला !