विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर अतिशय प्रेम केले. संकटकाळात ते माझ्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे बाळासाहेबांच्या प्रेमाचे कर्ज मी विसरू शकत नाही. त्यांचा मी आयुष्यभर आदर केला आणि यापुढेही करतच राहीन. महाराष्ट्रात भाजपची आमदार संख्या जास्त असताना देखील आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, ही माझी बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे, अशा भावपूर्ण श्रद्धांजली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. Making Shiv Sena Chief Minister is a tribute to Balasaheb
पण औरंगजेबाचा सन्मान आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्यांबरोबर बसून उद्धव ठाकरेंनी स्वतःहून बाळासाहेबांची विरासत सोडली ही त्यांची चूक आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आमच्या बरोबर आहे. त्यामुळे सहानुभूतीही आमच्याकडे आहे, अशा स्पष्ट शब्दांत नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे यांना फटकारले, पण त्याच वेळी उद्धव ठाकरे आपले व्यक्तिगत शत्रू नाहीत. परिवाराच्या नात्याने मी त्यांची कायम काळजीच करेन. त्यांनी मला कितीही शिव्या दिल्या तरी मी त्यांच्याबद्दल एक शब्दही बोलणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मोदींनी दिली.
टीव्ही 9 च्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबद्दल खुलेपणाने भाष्य केले. यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विषयी देखील मोदी स्पष्ट बोलले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले
औरंगजेबाचा सन्मान आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्यांबरोबर उद्धव ठाकरे बसले. त्यांनी सत्ता भोगली ही त्यांची चूक आहे. बाळासाहेबांनी कधीच अशा लोकांबरोबर तडजोड केली नसती. कारण बाळासाहेबांचे विचारच पूर्ण वेगळे होते. शिवसैनिकांसाठी बाळासाहेब कायम जगले. बाळासाहेबांनी माझ्यावर अतिशय प्रेम केले. त्यांचे ऋण मी विसरू शकणार नाही. भाजपचे आमदार जास्त असताना देखील शिवसेनेचा मुख्यमंत्री गेला की आमची बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे.
उद्धव ठाकरे हे काही माझे वैयक्तिक शत्रू नाहीत. बाळासाहेबांचे पुत्र या नात्याने त्यांच्याशी माझे परिवाराशी संबंध आहेतच. ते जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांची तब्येत बरी नव्हती तेव्हा रश्मी वहिनींशी मी नियमित संपर्कात होतो. फोनवरून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होतो. एकदा स्वतः उद्धव ठाकरेंनीच फोनवर मला सल्ला विचारला तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. आजही उद्धव ठाकरे संकटात सापडले तर मी परिवाराच्या नात्याने मदत करणारा पहिला व्यक्ती असेन, पण ही बाब फक्त परिवार आणि व्यक्तीपुरतीच मर्यादित राहील राजकारणाशी त्याचा संबंध असणार नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांची शिवसेना आज भाजपसोबत आहे आणि बाळासाहेबांना श्रद्धांजली म्हणूनच आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला आहे.
शरद पवारांना महाराष्ट्रात सहानुभूती मिळण्याची शक्यता नाही. मूळात शरद पवारांचा सहानुभूतीचा मुद्दा राजकीय दृष्ट्या चूक आहे. कारण शरद पवारांचा मामला हा सुद्धा कौटुंबिक मामला आहे. पक्षाची धुरा काम करणाऱ्या पुतण्याकडे सोपवायची की आपल्याला मुलगी आहे म्हणून तिच्याकडे सोपवायची, हा तो मामला आहे. शरद पवारांना या वयात देखील तो मामला सोडवता येत नाही, हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती असण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये राग जास्त आहे, अशा परखड शब्दांत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या राजकारणाचे वाभाडे काढले