एनआयएने केली कारवाई ; तक्रारीनंतर पंजाब पोलिसांनी आरोपी एजंटविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी डंकी रूटने लोकांना बेकायदेशीर पद्धतीने अमेरिकेत पाठवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली. आरोपी गगनदीप सिंग उर्फ गोल्डी हा पश्चिम दिल्लीतील तिलक नगरचा रहिवासी आहे. आरोपीने पंजाबमधील एका माणसाला बेकायदेशीरपणे अमेरिकेत पाठवले होते, ज्याला या महिन्याच्या सुरुवातीला भारतात परत पाठवण्यात आले.
एनआयएच्या निवेदनानुसार, पीडित पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील रहिवासी आहे. गोल्डीने त्याला डिसेंबर २०२४ मध्ये डंकी रूटने अमेरिकेला पाठवले. यासाठी आरोपी एजंटने त्याच्याकडून ४५ लाख रुपये घेतले होते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याला १५ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतात पाठवले. हद्दपारीनंतर, पीडित व्यक्तीने आरोपी एजंटविरुद्ध तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पंजाब पोलिसांनी आरोपी एजंटविरुद्ध गुन्हा दाखल केला. १३ मार्च रोजी एनआयएने हे प्रकरण ताब्यात घेतले. एनआयएच्या तपासात असे दिसून आले की आरोपी गोल्डीकडे लोकांना परदेशात पाठवण्याचा कोणताही परवाना किंवा कायदेशीर परवानगी नव्हती. तरीसुद्धा, गोल्डीने पीडित व्यक्तीला अमेरिकेत पाठवण्यासाठी डंकी रूट वापरला आणि स्पेन, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला आणि मेक्सिको मार्गे अमेरिकेत पाठवले.