विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशात भाजपने सलग पाचव्या निवडणुकीत बहुमत मिळवताना “गुजरात प्रयोग” यशस्वी करून दाखवलाच होता, पण त्या पुढे जाऊन मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये बिलकुल नाव नसलेले मोहन यादव यांना मुख्यमंत्री पदी आणून पुढच्या “गुजरात प्रयोगा”कडे वाटचाल सुरू केली आहे. madhya pradesh new chief minister mohan yadav
गुजरात मध्ये विजय रुपाणी यांना राजीनामा द्यायला लावून भाजपने भूपेंद्र पटेल या नवख्या नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली होती. विजय रुपाणींचे अख्खे मंत्रिमंडळ बदलून भूपेंद्र पटेल यांनी गुजरात मध्ये सर्वच्या सर्व नवीन मंत्री केले. त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती आता भाजपने मध्य प्रदेशात केली आहे.
भाजपने मध्य प्रदेशात कोणताही चेहरा समोर ठेवून निवडणूक लढवली होती. उलट 3 केंद्रीय मंत्री आणि 7 खासदारांना विधानसभा निवडणुकीत तिकिटे देऊन रणमैदानात उतरवले आणि भाजपला 163 जागांचे पूर्ण बहुमत मिळविले होते. त्यामुळे मध्य प्रदेश मध्ये मुख्यमंत्री पदाची रेस अखेरीस शिवराज सिंह चौहान यांच्या कडेच येऊन थांबणार, अशा अटकळी माध्यमांनी बांधल्या होत्या. परंतु माध्यमांच्या या सर्व अटकळी, अंदाज आणि कयास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त केले. माध्यमांनी बिलकुलच रेसमध्ये न आणलेले मोहन यादव यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या निर्णयाविषयी अंदाज आणि कयास बांधण्यात माध्यमे अपयशी ठरली.
मोहन यादव हे भूपेंद्र पटेल आणि इतके नवखे आमदार नसले तरी त्यांचे नाव कुठल्याच माध्यमांनी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये घेतले नव्हते. त्याऐवजी नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल यांची नावे माध्यमांनी आघाडीवर चालवली होती. त्याखेरीस मावळते मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याच पर्यंत मुख्यमंत्री पदाची रेस येऊन थांबेल, असे कयास माध्यमांनी बांधले होते. परंतु नरेंद्र मोदींच्या निर्णयापुढे हे माध्यमांचे हे सगळे कायास फोल ठरले.
अख्खी टीमच नवी
मोहन यादव हे ओबीसी नेते असून ते शिवराज सिंह यांच्याच मंत्रिमंडळात उच्च शिक्षण मंत्री राहिले. मोहन यादव मुख्यमंत्री, नरेंद्र सिंह तोमर विधानसभेचे अध्यक्ष, तर जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ल हे दोन उपमुख्यमंत्री अशी भाजपची पूर्ण नवी टीम मध्य प्रदेशावर आता राज्य करेल.