वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लोकसभेतल्या 315 सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास हवा आहे. कारण या सदस्यांनी लोकहिताचे अनेक मुद्दे या प्रश्नांद्वारे उपस्थित केले आहेत. त्यांना त्यांची उत्तरे हवी आहेत. परंतु एवढे असूनही विरोधक एका “नॉन ईश्यूवर” सदनाचे कामकाज बंद पडत आहेत, असा आरोप संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत केला. Lok Sabha want Question Hour, yet the Opposition closes the House in confusion; Allegations of Parliamentary Affairs Minister
सरकारला प्रत्येक महत्त्वाच्या बिलावर सदनात दोन्ही बाजूंनी चर्चा आणि टीकाटिपणी अपेक्षित आहे. एकही विधेयक चर्चेशिवाय संमत करावे, असे सरकारला अजिबात वाटत नाही. कारण आयटीपासून ते शेती विषयापर्यंत सर्व विधेयके सदनाच्या आणि संसदेच्या अजेंड्यावर आहेत.
त्यावर चर्चा करण्याची आणि त्या चर्चेला उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे. परंतु विरोधक पेगाससच्या मुद्द्यावरून गोंधळ घालून संसदेचे काम कर बंद पाडत आहेत, असा आरोप प्रल्हाद जोशी यांनी केला.
315 खासदारांनी विविध प्रश्न लेखी स्वरुपात विचारले आहेत. ते याच अधिवेशनाच्या अजेंड्यावरचे महत्वाचे विषय आहेत. त्याला उत्तरे देणे ही सरकारची बांधिलकी आहे. परंतु विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे ती पूर्ण करता येत नाही, असे प्रल्हाद जोशी म्हणाले.
आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पेगासस मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सविस्तर उत्तर दिले आहे. सरकारचा पेगाससशी कोणताही संबंध नाही. पेगाससला हेरगिरी करण्याचे किंवा कोणत्याही स्वरूपाचे कंत्राट कोणीही दिलेले नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तरीदेखील विरोधक या मुद्द्यावर आडमुठी भूमिका घेऊन संसदेचे कामकाज बंद पाडत आहेत, असा आरोप प्रल्हाद जोशी यांनी करून केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट शब्दात सांगितली.