विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्रिपुरा मधल्या जाहीर सभेत राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली आणि जगदानंद ते मल्लिकार्जुन खर्गे आदी नेत्यांना जबरदस्त राजकीय पोटशूळ उठला. मूळात हे राजकीय अपचन, पोटदुखी ते तीव्र पोटशूळ हे विकार सर्व लिबरल राजकीय पक्षांच्या नेत्यांना राम मंदिराच्या प्रत्यक्ष भूमिपूजनापासूनच जडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी 5 ऑगस्ट 2021 रोजी अयोध्येतील राम जन्मभूमी परिसरात भव्य राम मंदिराचे भूमिपूजन केले, त्या दिवशी देशभरातल्याच नाही, तर संपूर्ण जगातल्या हिंदू समाजाला प्रचंड आनंद झाला होता. पण त्यावेळी अनेक लिबरल नेत्यांना राजकीय अपचन होऊन पोटदुखीचा विकार जडायला सुरुवात झाली होती. तीच पोटदुखी आता राम मंदिर उद्घाटनाच्या तारखेमुळे तीव्र झाली आहे. किंबहुना या पोटदुखीचे रूपांतर तीव्र पोटशूळात झाले आहे.
राम मंदिर भूमिपूजनाच्या वेळी कोरोना काळात भूमिपूजन कशाला त्याऐवजी आरोग्य विषयक कामे करा, असे राजकीय अपचनयुक्त उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काढले होते. तरीही पंतप्रधान मोदींनी आपल्या “राजकीय गुरूंचे” न ऐकता राम मंदिराचे भूमिपूजन केले होते.
आता तर अमित शाह यांनी त्रिपुराच्या जाहीर सभेत एक जानेवारी 2024 रोजी भव्य राम मंदिर बांधून पूर्ण झाले असेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाचे बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांना राजकीय पोटदुखी तीव्र झाली. या पोटदुखीतूनच त्यांनी हे राम मंदिर नफरतीच्या जमिनीवर उभे असल्याचे उद्गार काढले. आम्ही राम वाले आहोत. जय श्रीराम वाले नाही, असे त्यांनी जाहीर करून टाकले. त्यानंतर हरियाणातल्या पानिपत मधल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री आहेत की राम मंदिराचे पुजारी?, असा प्रश्न विचारून तुम्ही गृहमंत्र्यांचे काम करा. पुजाऱ्यांचे काम करू नका, असा त्यांना सल्ला दिला.
कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी देखील मल्लिकार्जुन खर्गे यांचीच री ओढली. अमित शाह यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करण्यापेक्षा ती राम मंदिराच्या पुजाऱ्यांनी जाहीर केली असती, तर बरे झाले असते. पण आता गृहमंत्र्यांनी पुजाऱ्यांचे काम स्वीकारले आहे का?, माहिती नाही, असे खोचक उद्गार पवारांनी या पत्रकार परिषदेत काढले. पण एकूण मल्लिकार्जुन खर्गे आणि पवारांची वाढलेली पोटदुखीच त्यांच्या तोंडी वाफांमधून बाहेर आली.
पण या सगळ्यांचा राजकीय पोटदुखीचे मूळ कारण 2024 मध्ये दडले आहे. राम मंदिर बांधून पूर्ण झाले, त्याचे उद्घाटन झाले की आपल्या सगळ्या धर्मनिरपेक्ष राजकीय दुकानांची शटर खाली पडायला लागतील आणि आपली दुकाने कायमची बंद पडतील ही ती मूळ भीती आहे. 2019 प्रमाणेच 2024 ची लोकसभा निवडणूक जर राम मंदिर पूर्ण केल्याच्या मुद्द्यावर झाली, तर आपल्या तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांचे काही खरे नाही, या भीतीतूनच आधी अपचन, मग पोटदुखी आणि मग तीव्र पोटशूळ या क्रमाने लिबरल पक्षातील नेत्यांचे राजकीय दुखणे वाढत चालले आहे. ते दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
Liberal leadership very much politically upset over ram mandir completion date 1 January 2024
महत्वाच्या बातम्या