विशेष प्रतिनिधी
सातारा : अभिनेता राहुल सोलापूरकर आणि तथाकथीत पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर शिवभक्तांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर, या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशांत कोरटकर सध्या तुरुंगात आहे. मात्र, या घटनांवरुन सातत्याने तीव्र संताप होत असून छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी यासंदर्भात कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली होती. आता, लवकरच यासंदर्भात कायदा होणार असून स्वत: गृहमंत्री अमित शाह याची घोषणा करतील, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणाऱ्या अवमानावरून उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वारंवार आक्षेपार्ह विधाने केली जातात, या मुद्यांवर बोलताना सरकार काय बोळ्याने दूध पितं का? असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एक विशेष अधिवेशन बोलवावं आणि तात्काळ कायदा पारित करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली होती. तत्पू्र्वी गृहमंत्री अमित शाह यांचीही त्यांनी भेट घेतली होती. आता, याबाबत त्यांनी माहिती देत रायगडावरुन या कायद्याची घोषणा होऊ शकते, असे सांगितले.
या महिन्यात 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून घोषणा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात मी जी इच्छा व्यक्त केली होती, त्या कायद्याची घोषणा झाली तर याला वेगळं महत्व प्राप्त होईल, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, 12 तारखेला अमित शाह रायगडावरुन या कायद्यासंदर्भात घोषणा करतील का, हे पाहावे लागेल.
अजामिनपात्र कायदा करावा
राज्य शासनाने तज्ज्ञांशी विचारविमर्श करुन, ऐतिहासिक दस्तावेजांचा योग्य अर्थ लावून, यापूर्वीच शिवछत्रपतींसह मराठा साम्राज्याचा शासनमान्य साधार इतिहास प्रसिध्द करणे गरजेचे होते. आज विकृत प्रवृत्ती असलेली व्यक्ती, स्वतःच्या मनाप्रमाणे इतिहासातील प्रसंगाचे वर्णन करुन अकारण वाद निर्माण करतात. अशा प्रवृत्तींमुळे समाजामध्ये दुही पसरते. राज्यातील देशातील कायदा आणि सुव्यवस्था देखील बिघडते. मने कुलूषित होतात आणि त्याचे दीर्घ परिणाम समाजाला भोगावे लागतात. आमच्या संयमाचा कडेलोट होण्यापूर्वीच राज्य आणि केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिद्ध करावा. त्याचबरोबरीने अशा प्रवृत्तींच्या बाबतीत कायदेशीर कारवाई करता येणारा तसेच किमान 10 वर्षांची शिक्षा असणारा अजामिनपात्र विशेष कायदा पारित करावा, अशी मागणीही उदयनराजेंनी निवेदनाद्वारे अमित शाह यांच्याकडे केली. या मागणीला अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
Legal action against those who insult Chhatrapati Shivaji Maharaj
महत्वाच्या बातम्या
- Waqf Amendment Bill : 12 नव्हे, तब्बल 14 तासांची चर्चा, गरीब मुसलमानांचा फायदा, Waqf सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर!!
- Waqf Bill passed वक्फ विधेयक रात्री 2 वाजता लोकसभेत मंजूर; 60% जागा अतिक्रमणात, नोटिसा देऊनही हाती काही नाही
- 370 नंतर प्रथमच अमित शाहांचे स्फोटक भाषण; Waqf ने मंदिरे, गुरुद्वारे, चर्चेसच्या मालमत्ता हडपल्याचे केले सविस्तर वर्णन!!
- Waqf बिलावरच्या चर्चेत सर्व पक्षांचे लोकसभेतले गटनेते बोलले; पण राहुल + प्रियांका + सुप्रियांनी चर्चेतून पलायन केले!!