• Download App
    "भारतरत्न" लालकृष्ण अडवाणी : नेहरू - गांधी वादाच्या वावटळीत हिंदू राजकीय विचाराची मशाल उंचावणारे अध्वर्यू!! Lal Krishna Advani brought Hindu political thought in Indian political mainstream!!

    “भारतरत्न” लालकृष्ण अडवाणी : नेहरू – गांधी वादाच्या वावटळीत हिंदू राजकीय विचाराची मशाल उंचावणारे अध्वर्यू!!

    नेहरू गांधीवादाच्या वावटळीत हिंदू राजकीय विचाराची मशाल विझू न देता उंचावणारे अध्वर्यू, असेच “भारतरत्न” लालकृष्ण अडवाणींचे वर्णन करावे लागेल. कारण महात्मा गांधींच्या हत्येनंतर, जो हिंदू राजकीय विचार देशाच्या राजकीय अवकाशातून टप्प्याटप्प्याने अस्तंगत होत गेला, तो विचार इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजकीय अवकाशातून पूर्ण लुप्तप्राय झाला होता, त्या विचाराच्या ठिणगीला पुन्हा शिलगावून तिचे मशालीत रूपांतर करून ती मशाल उंचावणे हे खरे लालकृष्ण अडवाणींचे कर्तृत्व आहे. अडवाणींना भारतरत्न किताब जाहीर करून त्यांच्या कर्तृत्वाला मोदी सरकारने खऱ्या अर्थाने वंदन केले आहे!! Lal Krishna Advani brought Hindu political thought in Indian political mainstream!!

    ज्यावेळी “हिंदू”, “हिंदुत्व” हे शब्द देखील भारतीय राजकीय अवकाशाच्या आणि वातावरणाच्या बाहेर गेले होते, त्यावेळी अडवाणींनी आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीने आणि संघटनात्मक कौशल्याने तो विचार देशाच्या राजकीय कक्षेत आणला आणि टप्प्याटप्प्याने तो फुलवत नेऊन आजचा राजकीय मुख्य प्रवाह बनविला. लालकृष्ण अडवाणींचे हे खरे योगदान आहे.

    इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेल्या राजकीय वावटळीत भाजपचे फक्त 2 खासदार निवडून आले होते. भाजपचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी निवडणुकीत पडले होते. भाजप संघटना म्हणून रसातळाला पोहोचला होता. अशावेळी भाजपची संघटनात्मक धुरा अटल बिहारी वाजपेयी यांच्या हातून काढून घेतली गेली आणि ती लालकृष्ण अडवाणींच्या हाती सोपवली गेली. पक्षाच्या नेत्यांनी आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेला हा विश्वास अडवाणींनी त्यानंतरच्या अवघ्या 4 वर्षांमध्ये सार्थ करून दाखविला. आपल्या संघटनात्मक कौशल्याने त्यांनी भाजपला संसदेतला क्रमांक दोनचा पक्ष बनवून दाखविला. भाजप खासदारांची संख्या 2 वरून 86 वर पोहोचवली आणि त्याच्या पुढच्याच निवडणुकीत भाजप ट्रिपल डिजिटमध्ये पोहोचला. भाजपला संघटनात्मक पातळीवर तळागाळापासून उभा करून तो देशाच्या राजकीय प्रवाहातला मुख्य पक्ष बनविणे हे लालकृष्ण अडवाणींचे मुख्य योगदान ठरले. यासाठी त्यांनी सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्रा तसेच अन्य प्रभावी उपक्रम आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर राबविले.

    यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा मोलाचा वाटा होताच, पण भाजप सारखा राजकीय पक्ष जो देशाच्या राजकीय वातावरणात नेहरू – गांधी प्रणित राजकीय पक्षांनी “अस्पृश्य” ठरविला होता, त्या पक्षावरचे “राजकीय अस्पृश्यत्वाचे” जोखड उलथवून लावण्याचे काम अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या जोडीने केले. हे काम आजच्या मोदी – शाह युगात सोपे वाटत असले, तरी 1980 – 90 च्या दशकात ते अजिबात सोपे नव्हते, पण पक्षाची मूलभूत हिंदू विचारधारा कायम ठेवून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिकेत लवचिकता आणून अडवाणींनी हे साध्य करून दाखविले.

     सरदार पटेलांशी तुलना

    संघटनात्मक पातळीवर लालकृष्ण अडवाणींची तुलना नेहमीच काँग्रेस संघटनेतल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी होत राहिली. सरदार वल्लभभाई पटेल यांची काँग्रेस संघटनेवर मजबूत पकड होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर देशाच्या पंतप्रधान पदाचा मुद्दा चर्चेला आला, तेव्हा संपूर्ण देशातल्या 11 प्रांतिक काँग्रेस कमिट्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याच नावाची शिफारस पंतप्रधान पदासाठी केली होती. परंतु महात्मा गांधींचे राजकीय वजन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पारड्यात पडले आणि नेहरू पंतप्रधान झाले. सरदार वल्लभभाईंनी देखील महात्मा गांधींच्या निर्णयापुढे मान तुकवली, तसेच काहीसे लालकृष्ण अडवाणींच्या बाबतीतही घडले. आपल्या कुशल पण “कठोर” नेतृत्वाचा सरकार चालविण्यात अडथळा ठरवू शकतो, हे लक्षात येताच अडवाणींनी आपल्यापेक्षा तुलनेने “लवचिक” राजकीय भूमिका घेणाऱ्या आणि उदारमतवादी चेहरा असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची शिफारस पंतप्रधान पदासाठी केली आणि भाजपचा सत्तेचा मार्ग “मोकळा” करवून घेतला. अडवाणींचा हा राजकीय होरा अपेक्षेपेक्षा जास्त खरा ठरला. अटलजींच्या वाजपेयींच्या “लवचिक” राजकीय भूमिकेमुळे आणि उदारमतवादी चेहऱ्यामुळे देशातले अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसची कक्षा सोडून भाजपच्या कक्षेत येऊन स्थिरावले.

     नेतृत्वाच्या फळीचे निर्माते

    पण सरकार चालविण्याची कसरत करण्यात मात्र वाजपेयींसारखाच अडवाणी आणि जॉर्ज फर्नांडिस तसेच प्रमोद महाजन यांचाही महत्त्वाचा वाटा राहिला किंबहुना आपल्या पाठोपाठ एका मोठ्या नेतृत्व फळीची निर्मिती करणे हे आडवाणींचे आणखी एक राजकीय कर्तृत्व ठरले. डॉ. मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, नरेंद्र मोदी, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे अशी एकापाठोपाठ एक दिग्गज कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून त्यांच्यात देशाचे नेतृत्व क्षमता तयार करणे हे लालकृष्ण अडवाणींचे योगदान फार मोठे आहे.

     गुरुदक्षिणा!!

    देशात मोदी – शाह यांच्या भाजपचे युग सुरू झाल्यानंतर भाजपने लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक मंडळात पाठवून दिले, त्यांचे राजकीय महत्त्व कमी केले, वगैरे टीका माध्यमांमध्ये होत राहिल्या. पण मोदी – शाह किंवा संघ भाजपाची राजकीय संस्कृती आणि कार्यप्रणाली नीट माहिती असणाऱ्यांनी या टीकेकडे दुर्लक्ष केले. कारण अडवाणी किंवा मुरली मनोहर जोशी यांना खरंच मोदी आणि शाह यांच्या भाजपने “दूर” लोटले, हा आरोप वस्तुस्थितीला वस्तुस्थितीला धरून नव्हता. मोदी आणि शाह यांच्या भाजपचे युग 2014 नंतर सुरु झाले, पण त्यापूर्वी 2004 आणि 2009 या दोन लोकसभा निवडणुका लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. मुरली मनोहर जोशींच्या मार्गदर्शनाखाली लढल्या गेल्या होत्या, पण भाजपला जात अपेक्षित यश आले नव्हते, याकडे मात्र टीकाकारांचे दुर्लक्ष झाले होते किंवा त्यांनी हेतूतः दुर्लक्ष केले होते. पण हा आता इतिहास झाला आहे. भाजप या पक्षाला देशाच्या राजकारणातला मुख्य पक्ष बनविणाऱ्या, सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेच्या अध्वर्यूंना, लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न किताब जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “गुरुदक्षिणा” दिली आहे!!

    Lal Krishna Advani brought Hindu political thought in Indian political mainstream!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!