नाशिक : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर CPI(M) बऱ्याच वर्षांनी मराठी वर्चस्व येता-येता राहिले, अशोक ढवळे आणि डी. एल. कराड यांना मागे सारून केरळचे मरियम अलेक्झांडर बेबी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस झाले. केरळच्या कोझिकोडमध्ये झालेल्या मार्क्सवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षांतर्गत फार मोठे फेरबदल झाले. प्रकाश कारत, सीताराम येचुरी यांची पिढी मागे पडली. तब्बल 35 वर्षांनंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीस पदासाठी लोकशाही मार्गाने निवडणूक झाली आणि गुप्त मतदानाद्वारे केरळचे मरियम अलेक्झांडर बेबी यांनी डी. एल. कराड यांच्यावर मात केली. Kerala M. A. Baby
CPI(M)मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सध्याच्या राजकारणात फारसे महत्त्व उरलेले नाही. कारण केरळ वगळता त्यांची कुठेही सत्ता नाही. लोकसभेत त्यांचा प्रभाव उरलेला नाही. अन्यथा एकेकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीचे तब्बल 64 खासदार काँग्रेसच्या युपीए सरकारवर वर्चस्व राखून होते. प्रकाश कारत आणि सीताराम येचुरी ही दिल्लीच्या राजकारणातली बडी नावे होती. त्यांच्या आधी हरकिशन सिंग सुरजीत हे दिल्लीतल्या राजकारणामध्ये मार्क्सवाऱ्यांचा दबदबा राखून होते. हे तीनही नेते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे “बॉस” म्हणजे सरचिटणीस होते. 1996 मध्ये ज्योती बसू यांना पंतप्रधान बनण्याची संधी आली असताना हरकिशन सिंग सुरजीत यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस या नात्याने त्यांना पंतप्रधान बनण्यास प्रतिबंध केला होता. ज्योती बसू यांनी पक्षाच्या आदेश मान्य करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावरच कायमचे समाधान मानून घेतले. पण पंतप्रधान पदासाठी त्यांनी पक्षाशी बंडखोरी केली नाही. हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिस्तीचा करिष्मा होता.
मराठी राजकारणाच्या इतिहासात तर डाव्या पक्षांमध्ये फूट पाडून दोन्ही डाव्या पक्षांचे सरचिटणीस म्हणून बी. टी. रणदिवे आणि कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचे सरचिटणीस झाले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या राजकारणामध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेसवर दबाव आणण्याची कम्युनिस्टांची ताकद होती. पश्चिम बंगाल, केरळ या दोन राज्यांमध्ये कम्युनिस्टांची कायम सरकारे होती. पण साधारण 35 ते 50 खासदार संख्येने सतत पक्ष राहिल्याने दिल्लीच्या राजकारणासाठी मार्क्सवाद्यांना वगळून फारसे निर्णय घेता येत नसत.
आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिल्ली आणि राज्यांच्या राजकारणात तेवढे वर्चस्व शिल्लक राहिले नसले तरी केडर बेस पार्टी असल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते निष्ठेने काम करत आहेत. पक्षांतर्गत राजकारणाचे संतुलन राखून पक्षाला पुन्हा प्रभावी बनवण्याचे प्रयत्न करत आहेत. केरळच्या कोझिकोड मध्ये झालेल्या अधिवेशनात पक्षाला नवसंजीवनी देण्याविषयीचा विचार झाला. त्यातूनच पक्षाच्या पॉलिट ब्युरो मध्ये अमुलाग्र बदल करायचा निर्णय झाला. पक्षाचे कार्यवाहक सरचिटणीस प्रकाश कारत यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदासाठी मरियम अलेक्झांडर बेबी यांचे नाव सुचवले. 71 वर्षांचे बेबी केरळचे माजी शिक्षण मंत्री आहेत. त्याचवेळी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यातील पक्षाच्या प्रदेश शाखांनी अशोक ढवळे यांचे नाव त्या पदासाठी सुचवले होते. परंतु चर्चेच्या ओघात ते नाव मागे पडले त्यानंतर पक्षाच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष डी एल कराड यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला पण मरियम अलेक्झांडर बेबी यांना कराड यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली. कराड यांना 35 मते मिळू शकली. त्यामुळे 1978 नंतर प्रथमच झालेल्या निवडणुकीत बेबी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस पद जिंकले. पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या 64 सदस्यांपैकी 30 सदस्य नवे नेमले. प्रकाश कारत, वृंदा कारत, सुहासिनी अली हे ज्येष्ठ सदस्य पॉलिट ब्युरोच्या बाहेर गेले. मात्र त्यांना राष्ट्रीय समितीवर नेमले गेले.