विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी मध्ये दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचा कार्यक्रम शांततेत सुरू असताना काही कट्टरपंथीयांनी त्या कार्यक्रमात गदारोळ केला. ही मुसलमानांची युनिव्हर्सिटी आहे. इथे हिंदूंचा दिवाळीचा कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी दमबाजी करत कट्टरपंथीय विद्यार्थ्यांनी अल्ला हू अकबर, पॅलेस्टाईन झिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या. या संदर्भातले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला.
काही वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी असाच प्रचंड गदारोळ करून भारत तेरे टुकडे होंगे, अशा देशद्रोही घोषणा दिल्या होत्या. त्याच्या आठवणी जामीया मिलिया युनिव्हर्सिटीतल्या ताज्या घोषणांनी जागा झाल्या.
जामिया मिलिया विद्यापीठाच्या होस्टेल परिसरात विद्यार्थ्यांनी शांतपणे दीपोत्सव केला होता. अभाविप आणि स्थानिक विद्यार्थी संघटना एकत्र येऊन दरवर्षी शांतपणे दीपोत्सव साजरा करतात. यंदा देखील रांगोळ्या काढून शेकडो पणत्या त्यांनी परिसरात उजळल्या होत्या. परंतु ते पाहताच इस्लामी कट्टरपंथीय विद्यार्थ्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी दीपोत्सवाच्या ठिकाणी येऊन गदारोळ केला. कट्टरपंथीय विद्यार्थ्यांनी महिलांना शिवीगाळ केली.
या दरम्यान विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये मारामाऱ्या झाल्या. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली, असे डीजीपी रवी कुमार सिंह यांनी सांगितले. सध्या विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावला असून परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.