विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. हा विजय भारताच्या दृष्टीने अनेक कारणांसाठी खास होता. भारताने त्यावेळच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा पराभव करण्याचा भीम पराक्रम केला होता. ज्या ठिकाणावरून क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली त्या इंग्लंडच्या भूमीवर भारताने आपली प्रतिभा सिद्ध केली होती.Indira Gandhi brought world cup tournament in India in 1987
जागतिक क्रिकेटमध्ये भारत एक महासत्ता म्हणून उदयाला येण्याच्या दिशेने ते पहिले पाऊल होते. वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारताचे जगभर नाव गाजले. खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. मायदेशी आल्यानंतर त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींनी खेळाडूंसाठी खास मेजवानी आयोजित केली.
मात्र, या सर्व प्रकारात एक व्यक्ती अशी होती, जी १९८३च्या वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान अपमानित झाली होती. गोऱ्या साहेबांनी त्या व्यक्तीचा अपमान केला होता अन् तेही मॅचच्या तिकीटासारख्या अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी.
१९८३ वर्ल्डकप फायनलच्या केवळ दोन तिकीटांमुळं पुढील काही वर्षात इंग्लंडला क्रिकेट साम्राज्याच्या सिंहासनावरून पायउतार व्हावे लागले. त्यामागे त्याचं अपमानित झालेल्या भारतीय व्यक्तीची चाणक्यनीती होती.
1983 ची वर्ल्डकप स्पर्धा सुरू होती तेव्हा, भारताचे क्रेंदीय शिक्षण मंत्री सिद्धार्थ शंकर रे इंग्लंड दौऱ्यावर गेले होते. त्याच दरम्यान भारतीय संघ इंग्लंडमध्ये वर्ल्डकप फायनल खेळणार होता. वर्ल्डकप फायनलमध्ये आपल्या देशाच्या संघाला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी आयुष्यात एकदाच मिळते, अशा विचार करून सिद्धार्थ रे यांनी फायनल पाहण्याचा विचार केला.
फायनलची तिकीटे मिळवण्यासाठी त्यांनी आपले सहकारी मंत्री आणि बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन के पी साळवे यांना फोन केला. साळवेंनी आयोजक इंग्लिश क्रिकेट बोर्डाशी संपर्क करून दोन एक्स्ट्रा तिकिटांची मागणी केली. साळवेंना मिळालेले उत्तर अतिशय धक्कादायक होते. सध्याच्या काळात जर एखाद्या देशाच्या क्रिकेट बोर्ड अध्यक्षाला असं उत्तर मिळालं तर त्याचं नक्कीच मोठे आंतरराष्ट्रीय भांडवलं होईल.
आयोजकांनी बीसीसीआय अध्यक्ष साळवेंना दोन तिकीटं देण्यास स्पष्ट नकार दिला. तुम्हाला तुमच्या वाट्याची दोन तिकीट अगोदरच देण्यात आलेली आहेत, पाहिजे तर ती तुम्ही इतरांसाठी वापरू शकता. यापलिकडे एकही एक्स्ट्रा तिकीट मिळणार नाही, असे इंग्लिश क्रिकेट बोर्डाच्या आयोजकांनी साळवेंना सांगितले.
इंग्लंड क्रिकेट बोर्ड साळवेंना दोन तिकिटे अगदी सहज उपलब्ध करून देऊ शकत होत. मात्र, त्यांनी तसे केले नाही. उलट त्यांनी साळवेंचा अपमान केला. आपल्या बोर्डातील सर्व सदस्यांसाठी इंग्लंड तिकिट राखीव ठेवत असे. त्यांचं कारण देऊन ब्रिटिशांनी भारतीय मंत्र्याला तिकिट दिलं. प्रत्यक्षात पाहिलं तर, इंग्लंडचा संघ फायनलमध्ये नाही म्हणून इंग्लिश क्रिकेट बोर्डातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सामना पाहण्यास नकार दिला होता.
फायनलचा सामना सुरू असताना व्हिआयपी स्टँडमधील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. साळवेंनी ही गोष्ट आपल्या मनात कोरून ठेवली होती. आपल्या अपमानाची मोठी किंमत वसूल करण्याचा निश्चय त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांना क्रिकेटच मदत करणार होतं.
भारतीय संघ वर्ल्डकप जिंकून आल्यानंतर इंदिरा गांधीनं एक मेजवानी आयोजित केली होती. त्याच वेळी साळवेंनी गांधींच्या कानावर आपल्या सोबत घडलेली घटना घातली.
इंदिरा गांधी अतिशय खमक्या नेत्या होत्या.
आपल्या मंत्र्याचा झालेला अपमान नक्कीच त्यांना रुचला नव्हता. याबाबत शक्य त्या गोष्टी करण्याच्या सूचना गांधींनी साळवेंना दिल्या. 1987 चा क्रिकेट वर्ल्डकप भारतात आणण्याची आपली तयारी आहे फक्त त्यासाठी पैसा पाहिजे असल्याचे साळवे इदिंरा गांधींना म्हणाले होते.
इंदिरा गांधींनी उद्योगपती धीरूभाई अंबानींना फोन फिरवला. जर बीसीसीआयने क्रिकेट वर्ल्डकप भारतात आणला तर तुम्ही प्रायोजकत्व स्वीकारणार का? हा एकच प्रश्न इन्दिरा गांधींनी केला होता. त्यावर धीरूभाई अंबानी क्रिकेट वर्ल्डकप भारतात यावा यासाठी ब्लँक चेकवर सही करण्यास तयार झाले.
देशाचे पंतप्रधान आणि क्रिकेटवेड्या उद्योगपतीचा पाठिंबा मिळवून साळवेंनी आपली मोहिम सुरू केली. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी केली. क्रिकेटवरील ब्रिटिशांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आपल्याला सहकार्य करावे, अशी सूचना साळवेंनी पाकिस्तानी एअर चीफ मार्शल नूर खान यांना केली. पाकिस्तानने भारतासोबत मिळून वर्ल्डकप आयोजित करण्याची तयारी दर्शवली.
आयसीसीच्या मिटिंगमध्ये श्रीलंकेने देखील भारताला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या तीन आशियाई देशांचा एक ब्लॉक तयार झाला होता. आता साळवेंना फक्त एक मोठा मासा गळाला लावायचा होता. तो मासा म्हणजे ‘व्हेटो’पावर असलेला देश ऑस्ट्रेलिया होता.
जर १९८७मध्ये क्रिकेट वर्ल्डकप भारतामध्ये आला तर प्रस्तावित रोटेशन पॉलिसीनुसार त्यानंतर ऑस्ट्रेलियाला यजमान पद मिळेल, ही गोष्ट साळवेंनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या गळी उतरवली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने क्लोज बॅलेटमध्ये भारताला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं.त्यानंतर साळवेंनी आयसीसीमधील पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इतर असोसिएट दर्जाच्या राष्ट्रांना हाताशी धरून वर्ल्डकप इंग्लंडबाहेर हलवण्याचा ठराव बहुमतानं जिंकला. या सगळ्या कामात साळवेंना जगमोहन दालमियांचं मोलाचं सहकार्य लाभलं.
भारताने बहुमत जिंकल्यानंतर देखील इंग्लंडने, सामन्यांचं थेट प्रेक्षपण, खेळांडूंची सुरक्षा, राहण्याची व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था असे कितीतरी प्रश्न उपस्थित करून भारताची नाचक्की करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतानं इंग्लंडच्या प्रत्येक प्रश्नाला पद्धतशीर प्रत्त्युतर तयार ठेवलं होत. शेवटी ब्रिटिशांना भारतासमोर हार पत्करावी लागली आणि 1987 मध्ये पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकप इंग्लंडबाहेर खेळवण्यात आला.
– ट्रेंडसेटर वर्ल्ड कप
1987 मध्ये जागतिक क्रिकेटची पुनर्रचना झाली. आयसीसीमधील समीकरणं बदलली गेली. व्हेटो पॉवरच्या शस्त्रामुळे जागतिक क्रिकेटमधील निर्णयांवर वर्चस्व गाजवणाऱ्या इंग्लंडचा माज उतरवला. पहिल्यांदा वर्ल्ड कपसारखी मोठी स्पर्धा इंग्लंडच्या बाहेर गेली. जागतिक क्रिकेटमधील इतर देशांनी पहिल्यांदा आयसीसीमध्ये आवाज उठवण्यास सुरुवात केली.
एका भारतीय मंत्र्याचा अपमान इंग्लंडला किती महागात पडला हेच 1987 ते 2023 वर्ल्ड कपचा इतिहास सांगतो. जागतिक क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंड फक्त एकदा वर्ल्ड कप जिंकला, तर भारत दोनदा वर्ल्ड कप जिंकून तिसरा वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीला लागला आहे.
Indira Gandhi brought world cup tournament in India in 1987
महत्वाच्या बातम्या
- ‘IDF’ने घेतला बदला! जर्मन-इस्रायली तरुणीला जीपमधून नग्न फिरवणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याला केले ठार
- ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकाचा महामुकाबला!
- योगींच्या उत्तर प्रदेशात हलाल उत्पादन साठवणूक आणि विक्रीवर संपूर्ण बंदी!!
- इस्रायलने पुन्हा हमासच्या गैरकृत्यांचे पुरावे दिले, गाझा शाळेत ठेवलेल्या रॉकेट लॉन्चरचा व्हिडिओ जारी