विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट वर्ल्ड कप अंतिम सामन्यात भारताला वर्ल्डकप मिळवून देण्याची जबाबदारी फक्त गोलंदाजांचीच आहे, असे समजून अख्खी भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी समोर ढेपाळली. भारताचा डाव 240 वर आटोपला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान ठेवले आहे. worldcup final india vs australia
ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फार भेदक होती असे नाही, पण ती अचूक होती आणि टप्प्याटप्प्याने भारताच्या विकेट पडल्याने भारताची फलंदाजी खऱ्या अर्थाने बहरलीच नाही. के. एल. राहुल टॉप स्कोअर म्हणजे फक्त 66 धावा करणारा फलंदाज ठरला. कर्णधार रोहित शर्मा 47 धावा, सुपरस्टार फलंदाज विराट कोहली 54 धावा एवढीच काय ती चमकदार फलंदाजी पाहायला मिळाली. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी प्रत्येकी 4 धावा केल्या. भारताचे शेवटचे 5 फलंदाज तर मैदानावरची बाउंड्रीच विसरले होते. शेवटच्या 17 षटकांमध्ये अवघे 2 चौकार गेले. शेवटचे 5 फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टाकलेल्या बॉलला बॅट लावणे एवढे कर्तव्य बजावून ते तंबूत परतले.
नुकतीच दिवाळी संपली. त्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांच्या चौकार – षटकारांची प्रचंड आतषबाजी बघायला मिळेल अशी आशा आणि अपेक्षा धरून असलेल्या बसलेल्या 1.5 लाख प्रेक्षकांची निराशा झाली. पण त्या पलीकडे भारत संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही टीव्ही आणि मोबाईलला चिकटून बसलेल्या कोट्यावधी भारतीयांना भारतीय फलंदाजांच्या केपाच्या पिस्तुरातल्या टिकल्या आणि भिजलेल्या फुलबाज्या यांची आतषबाजी बघावी लागली.
अर्थात याच 2023 च्या वर्ल्ड कप लीग मॅच मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 199 धावांमध्ये गुंडाळले होते. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध भारताने फक्त 229 धावा केल्या असताना इंग्लंडला 129 धावांवर गुंडाळून तब्बल 100 धावांनी सामना जिंकला होता. आता ऑस्ट्रेलियाला अशाच पद्धतीने गुंडाळण्याची भारतीय गोलंदाजांकडून अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी फार भेदक गोलंदाजी केली असे नाही. पण भारतीय फलंदाज त्यांच्यापुढे आत्मविश्वासाने पाय रोवून खेळपट्टीवर उभे राहू शकले नाहीत. त्यामुळे भारताचा फार मोठा स्कोअर उभा राहू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज झंपा याने वर्ल्डकप मधल्या सर्वाधिक विकेट घेण्याची बरोबरी केली आहे. त्याने 23 विकेट्स घेतल्या आहेत.