देशातील सर्व समाजाचा अभ्यास करत असताना, सर्व जाती पंथाचा अभ्यास करण्यासाठी त्यामध्ये समरस होऊन समानता सर्व जाती व्यवस्थेत कशी आणता येईल व हा सर्व समाज एकसंध कसा बांधता येईल, देशात एकजूट निर्माण करून हा देश संघटीत कसा ठेवता येईल, अस्पृश्यता कशी हटवता येईल व दीन दलितांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय कसा मिळवून देता येईल व जाती निर्मूलन कसे करता येईल याचा बाबासाहेबांनी सखोल अभ्यास केला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन तत्त्वे समाजात रुजली पाहिजेत. ज्ञान, भूमी, संस्कृती हे तीन घटक राष्ट्रवादाची जगन्मान्य त्रिमिती आहे. तेवढ्याने राष्ट्र बनत नाही. हे बाबासाहेबांनी वेगवेगळ्या प्रकारे पटवून दिले आहे. सार्वजनिक बंधुभावनेचे तत्त्व नसेल तर समाज दुभंगलेला राहील त्यामुळे राष्ट्र दुर्बल होईल. In creating a national spirit and nation building, Dr. Extraordinary contribution of Babasaheb Ambedkar
लोकशाही ही बाबासाहेबांची जीवननिष्ठा होती. त्यांची लोकशाहीची संकल्पना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन तत्त्वावर आधारित होती. यामध्ये सर्वाधिक महत्त्व बंधुभावनेला देतात, बंधुभाव हाच आमचा धर्म आहे. या कार्यासाठी झटताना बाबासाहेबांनी आयुष्यभर सामाजिक समरसता कशी निर्माण करता येईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलेले त्यांच्या राष्ट्रकार्यातून दिसते. बाबासाहेबांनी ओळखले होते की जोपर्यंत समाजातील तळागाळातील माणूस आत्मगौरवाने उभा राहत नाही, तोपर्यंत हा देश उभा राहणार नाही: केवळ थोर पुरुषांमुळे देश मोठा होत नसतो, देश मोठा होण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा स्तर मोठा कावा लागतो.
राष्ट्र उभारणीतील सर्वात मोठे काम केले ते त्यांनी समाजातील सर्वात खालच्या श्रेणीत असलेल्या माणसाला जागे केले. हजारो वर्षे हिंदू समाजातील अस्पृश्य जाती सामाजिक रचनेत अगदी खाली होत्या. त्यांना सामान्य नागरी अधिकार, सामाजिक अधिकार, राजकीय अधिकार देखील नव्हते. सामाजिक गुलामगिरीत पिचत पडलेले होते. त्यांना वरील सर्व अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत, गुलामगिरीतून मुक्त केले. जे अधिकार सर्वसामान्य हिंदूना आहेत. जसे मंदिर प्रवेश, सार्वजनिक जागी प्रवेश, संपत्ती धारण करण्याचा अधिकार, व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य असे सर्व नागरी अधिकार तळागाळातील माणसांना मिळवून दिले. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, राम मंदिर, पर्वती आणि अंबामाता सत्याग्रह या सर्व सत्याग्रहातून बाबासाहेबांनी अहिंसक सामाजिक क्रांती केली. सामाजिक बदल होण्यासाठी रशिया, फ्रान्स, अमेरिका येथे रक्ताचे पाट वाहीले. परंतु बाबासाहेबांनी कोणताही लढा कधी हिंसक केला नाही.
महाडच्या सत्याग्रहातील जाहीरनाम्याचे शीर्षक होते “हिंदूमात्रांच्या जन्मसिद्ध अधिकारांचा जाहीरनामा”. यातील अनेक विषय भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या भागात आलेत. गोलमेज परिषदेच्या जाहीरनाम्यातील काही भाग राज्यघटनेत आला आहे. सायमन कमिशनला साक्ष देताना आम्हाला प्रोटेस्टंट हिंदू म्हणा किंवा नॉन कन्फर्मिस्ट हिंदू म्हणा हे असे सांगून हिंदूंकडून दलितांवर अन्याय व अत्याचार व जुलूम किती प्रमाणात होतो हे लक्षात आणून देण्यासाठी अशी भूमिका घेणे भाग पडले कारण समानता आणायची होती.
डॉ. बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. आता राज्यघटनेच्या घटनात्मक मार्गाने अनुसूचित जाती व जमातींचा प्रश्न सोडवला आहे. घटना समितीच्या अखेरच्या भाषणात ते म्हणाले होते की “जाती राष्ट्र विनाशक आहेत, लवकरात लवकर आपण त्यातून मुक्त झालो पाहिजे.” जाती निर्मूलन भाषणाचा शेवट करताना बाबासाहेब म्हणाले, ”स्वराज्य रक्षणाच्या प्रश्नापेक्षाही स्वराज्यामध्ये हिंदूंचे रक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे. माझ्या मते, हिंदू समाज जातीविरहित, एकसंध होऊन तो स्वरक्षणासाठी अधिक शक्तिशाली झाला तरच त्याला काही आशा आहे. १९५१ साली डॉ. बाबासाहेबांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. कारण हिंदू कोड बिल बारगळले होते.
हिंदू कोड बिल, हिंदूचे विवाह वारसाहक्क, स्त्रियांचे हक्क, मालमत्तेचे अधिकार इत्यादी विषय होते. हे बिल बौद्ध, जैन व शीख यांना लागू करणे हे फार मोठे ऐतिहासिक कार्य आहे. हिंदू कोड बिलचा विषय चालू असताना फक्त हिंदूंसाठीच नागरी संहिता का? भारतात मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारशीही राहतात. मग सर्वांसाठी समान नागरी कायदा का नको ? असा बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित केला होता. एक राष्ट्रीयत्व निर्माण होण्यासाठी देशात राहणाऱ्यांना एकच कायदा लागू झाला पाहिजे. मुस्लिम व्यक्तिगत कायदा बाबासाहेबांना मान्य नव्हता. ते समान नागरी कायदयाच्या बाजूचे होते. डॉ. बाबासाहेब उत्कृष्ट अर्थतज्ञ, जलतज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ होते. डॉ. बाबासाहेबांनी नदी जोड हा विषय सर्वप्रथम मांडला आहे.
बाबासाहेबांच्या राष्ट्रभक्तीचा एक प्रसंग असा आहे, तेव्हा भारतात ए. एन. खोसला या नावाचे नामवंत इंजिनिअर होते. भाक्रा नांगलपासूनची मोठी धरणे उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची नियुक्ती सेंटर वॉटरवेल इरिगेशन अँन्ड नेव्हिगेशन कमिशनवर चेअरमन म्हणून झाली. या कमिशनवर एका इंग्रज माणसाची नेमणूक केली जावी, असा इंग्रज मंत्र्यांचा आणि अधिकाऱ्यांचा आग्रह होता. डॉ. बाबासाहेबांची इच्छा एका भारतीयाने हे काम करावे, अशी शेती. ए. एन. खोसला यांचे नाव पुढे आले. बाबासाहेबांनी खोसला यांना भेटीस बोलावले आणि ते त्यांना म्हणाले, या जागेवर इंग्रजांची नियुक्ती करावी म्हणून माझ्यावर प्रचंड दडपण येत आहे. परंतु माझी इच्छा आहे की एका भारतीयाने ही जबाबदारी घ्यावी. तुम्ही ती घेऊ शकता. ए. एन. खोसला यांनी तत्काळ होकार दिला. ही होती बाबासाहेबांची स्वदेशी दृष्टी. डॉ. बाबासाहेब देशाची दुबळी राज्यसत्ता स्वीकारण्यास तयार नाहीत. भारताचा इतिहास काय सांगतो? तो हे सांगतो की, जेव्हा जेव्हा भारताची केंद्रसत्ता दुर्बळ झाली तेव्हा तेव्हा भारत परकीय आक्रमणाचा शिकार झाला आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती बाबासाहेबांना नको होती. म्हणून त्यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत केंद्राने सर्व सत्ता हाती घेण्याची व्यवस्था राज्यघटनेत करून ठेवली आहे.
बाबासाहेबांची महानता यात आहे की, त्यांनी राज्यांना सत्ता दिली आणि केंद्राला शहाणपण दिले. आपली राज्ये अनेक बाबतीत स्वायत्त आहेत. परंतु ती सार्वभौम नाहीत. सार्वभौम भारत आहे. बाबासाहेबांनी देशाला एक चलन दिले, एक नागरिकत्व दिले. सर्वांना समान राजकीय, आर्थिक, सामाजिक अधिकार दिले. राष्ट्राचा प्राण राष्ट्राच्या भावनिक एकतेत असतो, आम्ही एक आहोत. मग आमची भाषा कोणतीही असो, आमचा उपासना पंथ कोणताही असो. पण आम्ही एक राष्ट्र आहोत. ही भावना महत्त्वाची आहे.
राष्ट्र उभारणीत बाबासाहेबांचे हे योगदान अलौकिक आहे. अशा या महापुरुषास कोटी कोटी प्रणाम.
– प्रा. डॉ. डी. डी. कुंभार, पुणे
In creating a national spirit and nation building, Dr. Extraordinary contribution of Babasaheb Ambedkar
महत्वाच्या बातम्या