वृत्तसंस्था
होजई – आसाम आणि पश्चिम बंगालमधून बांगलादेशींना हाकलून देण्याच्या बाता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मारतात… पण मी त्यांना आव्हान देतो, त्यांनी १०० तरी बांगलादेशींना आत्तापर्यंत हाकलून दिलेय का ते सांगावे, अशी दर्पोक्ती ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांनी आसाममधील मतदानाच्या दिवशी केली. I challenge modi – shah to tell if even 100 Bangladeshis have been sent back in the last 5 yrs. They are the ones who get them here: Badruddin Ajmal
आसाम आणि बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातले मतदान सुरू आहे. होजईमध्ये मतदान केल्यानंतर बद्रुद्दीन अजमल बोलत होते. अजमल यांचा पक्ष काँग्रेसशी आघाडी करून आसामच्या निवडणूकीत उतरला आहे.
मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजमल म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा नेहमी म्हणत असतात, आम्ही बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावू… पण मी त्यांना आव्हान देतो, त्यांनी पुढे येऊन सांगावे की त्यांना गेल्या ५ वर्षांमध्ये १०० तरी बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावता आलेय का, ते. उलट मोदी आणि शहा आहेत, की जे वेगवेगळ्या मार्गांनी बांगलादेशी घुसखोरांना भारतात घुसण्याचे मार्ग उपलब्ध करून देतात, असा आरोपही बद्रुद्दीन अजमल यांनी केला.
भाजपने बंगाल आणि आसामच्या निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये सीएए आणि एनआरसी कायदे लागू करण्याचा उल्लेख केला आहे. त्यावर बद्रुद्दीन अजमल यांनी आक्षेप नोंदविला. भारतातल्याच नागरिकांना त्रास देण्यासाठी या कायद्यांचा उपयोग होतो आहे. त्याच्यामुळे आसाम आणि बंगालमध्ये अनेकांना वारंवार आपले नागरिकत्व सिध्द करावे लागते आहे, असा आरोपही अजमल यांनी केला.