विशेष प्रतिनिधी
पुणे : राहुल बजाज यांच्या खानदानाचे नेहरू-गांधी खानदानाशी अत्यंत निकटचे संबंध होते. महात्मा गांधी हे तर राहुल बजाज यांचे पिताश्री कमलनयन बजाज यांना आपले पाचवे पुत्र मानायचे.Exchange of Nehru-Indira and Rahul-Rajiv names
सहाजिकच स्वातंत्र्यपूर्वकाळात नेहरू परिवाराशी कमलनयन बजाज यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. महात्मा गांधींच्या आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरू आणि कमलनयन बजाज हे अनेकदा खांद्याला खांदा लावून लढले. कमलनयन हे इंदिराजींचे सहाध्यायी होते. 1938 मध्ये जेव्हा राहुल बजाज यांचा जन्म झाला त्याची बातमी सांगायला कमलनयन बजाज नेहरूंकडे गेले. नेहरूंनी त्यावेळी मुलाचे नामकरण राहुल असे केले.
पंडितजींनी कमलनयनजी यांच्या मुलाचे नामकरण राहुल असे केल्याची बातमी काही दिवसांत इंदिराजींना समजली आणि त्या काहीशा नाराज झाल्या. कारण इंदिराजींना आपल्या मुलाचे नाव राहुल ठेवायचे होते. 1942 मध्ये इंदिराजींच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. त्यावेळी त्यांनी राहुल ऐवजी त्या मुलाचे नाव राजीव ठेवले. हा किस्सा स्वतः राहुल बजाज यांनी एका कार्यक्रमात सांगितला होता.
राहुल बजाज आणि राजीव गांधी यांचीही मैत्री पुढे कायम राहिली. 1984 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान झाले. यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेची कवाडे थोडीफार खुली झाली. उद्योजकांना औद्योगिक धोरण ठरविण्यात सहभागी करून घेण्यात आले. यामध्ये राहुल बजाज अर्थातच आघाडीवर होते.