कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजेच आपल्या सर्व खर्चांचे योग्य नियोजन होय. नोकरी किंवा व्यवसायातील उत्पन्नाचे आपण किती प्रभावीपणे नियोजन करतो हे महत्त्वाचे असते. कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्त्वाच्या घटकांमध्ये विभागू शकतो. दैनंदिन गरजांसाठीचा खर्च, अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठीचा खर्च, दैनंदिन खर्चासाठी बचत, दीर्घकालीन योजनांसाठी गुंतवणूक. या चार घटकांसाठी आपण योग्य नियोजन केले की आपण आपल्या अर्थसंकल्पात यशस्वी झालो असे म्हणता येईल. Money Matters: The family budget comes from proper planning of all your expenses
आपले अल्पकालीन किंवा दीर्घकालीन ध्येय असे असावे की ते आपल्या आर्थिक क्षमतेच्या आवाक्यात असतील व त्याचा आपल्या नियोजनावर कधीच ताण पडणार नाही. नवीन वाहन, नवीन घर किंवा मोठे घर, मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न तसेच निवृत्तिनियोजन वगैरे आदी झाले अल्पकालीन किंवा दीर्घकालीन खर्च. स्वप्नपूर्तीसाठी गुंतवणूक करताना आपण भविष्यात होणाऱ्या खर्चाचा बारकाईने अभ्यास करून नियोजन करावयास हवे.
उदाहरणार्थ – आपल्याला येत्या चार वर्षांत नवीन वाहन घ्यायचे झाल्यास केवळ वाहनाचे एक्स-फॅक्टरी किमतीसाठी नियोजन करून चालणार नाही. आपल्याला वाहनाचे डाऊन पेमेंट, मासिक हप्ता, नोंदणी, वाहनाचा विमा, पेट्रोल वा डिझेल, वाहनचालक ठेवायचा असल्यास त्याचा खर्च आणि नियमित वाहनाचे देखभाल आदी सर्व खर्चाचा आपल्या आर्थिक नियोजनात अंतर्भाव करावा लागेल. अशा पद्धतीने योग्य व सविस्तर नियोजन केल्यास आपल्यावर घरी पांढरा हत्ती पाळण्याची वेळ येण्याची भीती राहात नाही. महागाईमुळे होणारी खर्चातील संभाव्य वाढ लक्षात घेतली नाही तर कुटुंबाचा अर्थसंकल्प कोलमडू शकतो. अशा प्रकारे योग्य नियोजन केल्यास कोणताही ताण न घेता आपण ठरवलेले ध्येय विहित कालावधीत पूर्ण करू शकतो.