मुलांच्या शिक्षणाबाबत असलेल्या इच्छा- आकांक्षांचे केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार हल्लीची पिढी उपलब्ध पर्यायांपैकी नवनवीन वाटा धुंडाळत असले तरी पालकांची यासाठी जी आर्थिक तयारी लागते ती नसते. त्यामुळे अनेकदा कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडते. मुलांसह पालक समाजमाध्यमांतून ज्येष्ठ आणि माजी विद्यार्थी आणि अभ्यासक्रम आणि क्रेडिट्स कसे वाढतात हे शोधण्यासाठी सल्लागार, ज्या पालकांना आपल्या मुलांना परदेशात पाठविण्याचा अनुभव आहे असे पालक, शिष्यवृत्ती आणि कर्जाची शक्यता आणि नंतर रोजगाराच्या संधी शोधतील याबाबत माहिती मिळविताना दिसतात. Money Matters: Provide for your children’s education on time
वास्तविक मुख्यत: पैशांच्या निर्णयावर मुलांची इच्छा पूर्णत्वाला जाते. उच्च शिक्षणासाठी करावयाच्या तरतुदींचा पालकांनी नेहमी साकल्याने विचार केला पाहिजे. यासाठी प्रथम मुलाशी खर्चाबद्दल आणि कुटुंबाने केलेल्या आर्थिक तरतुदी, उपलब्ध पर्याय याबद्दल स्पष्टपणे बोलावे. जर मुलाच्या शिक्षणासाठी कुटुंबाची एखादी संपत्ती किंवा दागिणे विकणार किंवा गहाण ठेवणार असाल तर, तसे स्पष्टपणे सांगा. कुटुंबाच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत ही रक्कम किती मोठी आहे? हा खर्च केल्यानंतर पालकांचे निवृत्तीपश्चातचे उत्पन्न किती सुरक्षित आहे?
यामुळे कुटुंबातील इतर मुलांच्या बजेटवर याचा काय परिणाम होतो? यामुळे पालकांच्या सेवानिवृत्तीच्या उद्दिष्टांना कितपत बाधा येणार आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. मुलाला पालकांनी आनंदाने पैसे दिले तरी कुटुंबातील हा निर्णय किती मोठा आहे हे त्याला समजू द्या. भविष्यात पश्चात्ताप होईल यापेक्षा सुरुवातीलाच हे सांगणे कधीही चांगले. गरज भासल्यास कर्ज घेण्याचा पर्यायाचा विचार करावा. दुसरे म्हणजे मुलाने कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील याची रूपरेषा सांगा. हे सांगितल्याने मूल अस्वस्थ होईल, असा विचार करू नका. शक्य असल्यास दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीमार्फत तुम्ही उचलत असलेल्या आर्थिक बोजाची, त्याच्या परिणामांची जाणीव करून द्या. जेव्हा अपेक्षेनुसार गोष्टी घडणार नसल्या तर त्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत हे ठरवा. अनेकदा एका पर्यायातून दुसरा पर्याय अशी पर्यायांची मालिका सुरू होते. चार वर्षांत पदवीधर किंवा दोन वर्षांच्या पुढे पदव्युत्तर पदवीधारक होण्याची वेळ वाढत जाते. कुठे थांबायचे याचाही विचार होणे गरजेचे आहे.