सर्वसाधारणपणे नोकरदार वर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा येतो, तो रिटायरमेंटच्या वेळी. अचानक जास्त पैसा हातात आल्यामुळे आणि पुढचा नियमित पगार बंद होणार या भीतीने ग्रासल्यामुळे अशा निवृत्त व्यक्तींना योग्य गुंतवणूक मार्गदर्शनाची खरी गरज असते. परंतु नेमक्या याच व्यक्ती चुकीच्या सल्ल्यामुळे फसवल्या जाण्याची शक्यता असते. निवृत्तीनंतर नियमित पगार येणे बंद होते किंवा खर्चाला साजेशी पेन्शन नसते. शिवाय, कधी कधी निवृत्तीनंतर मोठे खर्च असतात, जसे की मुलांचे उच्च शिक्षण, मुलांचे लग्नकार्य, घरातील मोठी डागडूजी इत्यादी. त्यात बऱ्याचदा जोखीम घ्यायची मानसिक किंवा आर्थिक क्षमतासुद्धा कमी झालेली असते. अशा वेळी काही वरिष्ठ गुंतवणूकदार हमीचे परतावे हवे असा हट्ट धरतात. मग त्यांना जास्त जोखीम असलेले बाँड विकले जातात. Money Matters: Always keep these four criteria in mind when investing after retirement
अजून एक गोष्ट अशा गुंतवणूकदारांच्या डोक्यात असते आणि ती म्हणजे कर वाचवणे. म्हणून असे गुंतवणूकदार मग युलिप आणि विमा घेतात. हे सारे टाळायचे असेल तर निवृत्तीच्या आधीच आपला आर्थिक आराखडा तयार करा. आज आयुर्मान वाढत आहे आणि त्याबरोबर आरोग्य व राहणीमानाचे खर्चसुद्धा. पुढच्या तीस-पस्तीस वर्षांमधील मिळकत आणि खर्चाचा हिशोब आधीच घाला आणि त्यानुसार कोणती गुंतवणूक करायची हे ठरवा. ध्येयाच्या कालावधीनुसार गुंतवणूक करा. सगळेच पैसे सुरक्षित हवे, असे म्हणून बँकेत किंवा पोस्टात ठेवू नका. याउलट म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात परतावे जास्त मिळतील, या अपेक्षेने सगळेच पैसे तिथेही नको. गुंतवणुकीचा पर्याय निवडताना चार मापदंड लक्षात ठेवा. रोकड सुलभता, परतावे, जोखीम आणि कर कार्यक्षमता. यातील कुठल्याही एकाच गोष्टीवर भर देऊ नका. फक्त कर लागत नाही म्हणून युलिप किंवा महागडी विमा पॉलिसी काढू नका. त्यापेक्षा एक चांगले आरोग्य विमा कव्हर घ्या. आपल्या देशात आरोग्यासाठी होणारा खर्च इतर खर्चांपेक्षा अधिक पटीने वाढत आहे. बेस पॉलिसी आणि सुपर टॉप-अपची नीट सांगड घालून वाजवी प्रीमियममध्ये तुमच्या गरजा भागतील, याकडे लक्ष असू द्या.