अनेकदा आपल्याला खर्च व गुंतवणूक यातील नेमका फरक समजत नाही. त्यामुळे पैसे मिळवण्याप्रमाणेच त्याची योग्य ठिकाणी गुंतणूक करणे फार गरजेचे असते. खर्च व गुंतवणुकीत नेमका काय फरक आहे हे सोप्या उदाहरणावरून स्पष्ट होईल. समजा एक शेतकरी आहे, त्याने उत्पादन केलेल्या धान्यापैकी काही धान्य त्याने स्वतःसाठी काढून ठेवले. आता हे धान्य गुंतवणुक झाली का? जर त्याने ते धान्य पेरणी साठी वापरले तर, हो आणि जर त्याने हे धान्य घरी खाण्यासाठी वापरले तर नाही. Money in your closet, not an investment
जमा करणे म्हणजे झाली बचत, खाणे म्हणजे झाला खर्च आणि पेरणे म्हणजे झाली गुंतवणुक. जर तुमचा पैसा वाढत असेल तरच ती गुंतवणुक आहे. कपाटात पैसे ठेवणे म्हणजे गुंतवणुक नाही. मात्र आपल्या समाजात आर्थिक साक्षरतेचा मोठा अभाव असल्याचे आपल्याला पहायला मिळते. त्यामुळे अनेकदा योग्य ठिकाणी गुंतवणूक केली जात नाही. त्यामुळे पैसे आहे तितकेच राहतात किंवा काही वर्षांनी ते वाढण्याऐवजी त्याचे मुल्य कमी झाल्याचेच पहायला मिळते. आपल्या सर्वांना शाळा, कॉलेजमध्ये हव्या-नको त्या सगळ्या विषयांचे शिक्षण दिले जाते, वेगवेगळ्या विषयांचे कामाचे आणि बिनकामाचे बोजड ज्ञान आपल्या डोक्यात भरवले जाते. पण जगण्यासाठी अत्यावश्यक असणारे आर्थिक साक्षरतेचे ज्ञान, आपल्याला शाळा कॉलेजात कधीच शिकवले जात नाही. खरे तर त्याची सध्याच्या काळात नितांत आवश्यकता आहे.
गरीब लोक आपल्या कमाईतुन आपले मुलभुत गरजा, आपले खर्च भागवतात. मध्यमवर्गीय लोक आपली कमाई गरजा आणि चैनीच्या गोष्टी मिळवण्यावर खर्च करतात. श्रीमंत लोक मात्र आपली कमाई योग्य ठिकाणी गुंतवतात आणि त्यातुन मिळालेल्या नफ्यावर आपले आयुष्य सुखाने जगतात, आयुष्याचा खराखुरा आनंद घेतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला एक नजर टाकल्यास तुमच्या एक बाब नक्की लक्षात येईल ती म्हणजे परिस्थीती कशीही असो श्रीमंत लोक सतत श्रीमंत होत जात असतात. कारण त्यांना हाती असलेला पैसा कोठे गुंतवायचा याची नेमक्या पद्धतीने माहिती असते.