वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नीरज चोप्रा याने भारतीय ऑलिंपिकच्या इतिहासात स्वतःचेच नाव सुवर्णाक्षरांनी कोरले असे नाही, तर त्याचे गाव पानिपतचे देखील नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. During a phone call, PM Narendra Modi congratulates javelin thrower Neeraj Chopra who won gold
यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजशी बोलताना, “पानिपत ने पानी दिखा दिया”, असे गौरवोद्गार काढले. पंतप्रधान मोदी यांनी नीरज याचे खास फोन करून अभिनंदन केले. ते म्हणाले, की आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा मला तुझा चेहर्यावर अतिशय आत्मविश्वास दिसत होता. एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेचा कोणताही दबाव तुझ्या चेहऱ्यावर दिसला नाही. तू दबाव न घेता खेळलास. त्यामुळे आज सुवर्ण पदक मिळवून तू देशाचा गौरव वाढविलास.
यावर नीरज म्हणाला, की सर्व देशवासियांनी आणि आपण स्वतः मला कायम प्रोत्साहन दिले. देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करून दाखविण्याचे प्रेरणा दिली. त्यामुळेच मी देशासाठी सुवर्णपदक आणू शकलो.
पंतप्रधान मोदी आणि नीरज यांच्यातील विजयी संवादामुळे देशाला आज एक नवा वाक्प्रचार मिळाला, “पानिपतने पानी दिखा दिया” आजपर्यंत पानिपत या शब्दाचा मराठ्यांच्या कथित पराभवाची संबंध जोडण्यात येत असे. परंतु नीरज चोप्राने दाखविलेल्या पराक्रमाने ही म्हण आता इतिहासातजमा झाली आहे. आता पराभव झाल्यावर “त्याचे पानिपत झाले” असे म्हणायचे नाही, तर विजयी झाल्यावर “पानिपतने पाणी दाखवले”, असे म्हणायचे हे पंतप्रधान मोदी आणि नीरज चोप्रा यांनी दाखवून दिले आहे.
किंबहुना नीरज चोप्राने भारताच्या इतिहासात पानिपतचा उल्लेख करताना जे पराभवाचे सावट येते ते सावटच एक प्रकारे दूर केले आहे. पानिपतच्या युद्धात मराठे हरवल्याचा समज पसरल्यामुळे मराठीत एक वाक्प्रचार पडला होता. हरणाऱ्याला “त्याचे पानिपत झाले”, असे म्हटले जायचे. परंतु नीरज चोप्रा या पानिपतच्या लढवय्या खेळाडूंमुळे इथून पुढे जिंकल्याबद्दल “त्याने पानिपत केले”, असे म्हणायला हरकत नाही.
पानिपतच्या तेवीस वर्षाच्या नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळवले. पानिपतमध्ये त्याच्या घरासमोर मंडप टाकून शेकडो पानिपतकरांनी त्याच्या विजयाचा खेळ पाहिला आणि आनंद लुटला. एक प्रकारे ते पानिपतच्या या विजयाच्या इतिहासाचे साक्षीदार झाले.
त्यामुळेच हरल्याबद्दल एखाद्याचे “पानिपत झाले” हा वाक्प्रचार आता नीरज मुळे जिंकल्यानंतर एखाद्याने “पानिपत केले” असा बदलला पाहिजे आणि तो बदलण्याची किमया नीरजने आपल्या प्रचंड कर्तृत्वाने केली आहे. भविष्यात विजयासाठी त्याने पानिपतचे पाणी दाखविले”, हा वाक्प्रचार रूढ केला पाहिजे.