विशेष प्रतिनिधी
भोपाळ – ग्रामीण भागातील रहिवाशांना मालमत्तेच्या कागदपत्रांआधारे आतापर्यंत त्रयस्थाकडून कर्ज घ्यावे लागत होते. मात्र, स्वामित्व योजनेमुळे आता त्यांना बॅंकांकडून थेट कर्ज घेता येईल. छोटे हेलिकॉप्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ड्रोनने गावांच्या विकासाचा चेहरा बदलला असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.Drone change face of villages
स्वामित्व योजना प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, हरियाना आणि कर्नाटकमध्ये राबविण्यात आली. आता, लोकांना मालमत्तेचे कार्ड देण्यासाठी संपूर्ण देशभरात ती राबविली जाईल. आतापर्यंत योजना राबविलेल्या राज्यांत २२ लाखांपेक्षा अधिक कुटुंबाना मालमत्तेचे कार्ड देण्यात आले.
पंतप्रधानांच्या हस्ते २४ एप्रिल २०२० रोजी देशाचा ग्रामीण भाग स्वावलंबी आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी स्वामित्व योजनेचे उद्घाटन झाले. त्यातून गावांचे सर्वेक्षण आणि ग्रामीण भागाचे सुधारित तंत्रज्ञानासह मोजमाप केले जाते. ड्रोनद्वारे ग्रामीण भागातील मालमत्तेची मालकी स्पष्ट करण्याचा स्वामित्व योजनेचा हेतू आहे.