नाशिक : अखेर इतिहासाने “न्याय” केला. निष्णात अर्थतज्ञ अर्थमंत्री आणि अनुभवी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आडाखा बरोबर ठरला. देशाच्या आर्थिक सुधारणा धोरणाचे कार्यवाहक, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कालवश झाल्यानंतर त्यांच्याविषयी संपूर्ण देशात आणि परदेशांमध्ये ज्या भावना व्यक्त झाल्या, त्यातून त्यांच्याविषयी इतिहासाने “न्याय” केला, असेच म्हणावे लागेल. या बाबतीत मनमोहन सिंग यांचा आडाखा बरोबर ठरला.
2014 मध्ये पंतप्रधान पदावरून पायउतार होताना मनमोहन सिंग यांनी आपल्या कामगिरीचे मूल्यमापन इतिहासावर सोपविले होते. मी काय केले आणि कसे केले??, याविषयी मी स्वतः बोलण्यापेक्षा इतिहासच बोलेल, इतिहासच “न्याय” करेल, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले होते. एका बुद्धिमान आणि निष्णात अर्थतज्ञाचे आणि अनुभवी पंतप्रधानाचे ते वक्तव्य होते.
तो काळच कसा होता, ज्यावेळी संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग हे वेगवेगळ्या आरोपांच्या वादळाने घेरले होते. टू जी पासून कोळसा घोटाळ्यापर्यंतचे वादळ काँग्रेस आणि यूपीए सरकारवर घोंगावत होते. मनमोहन सिंग हे “एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर” आहेत. ते स्वतंत्रपणे काही निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना कायम 10 जनपथच्या निर्देशांखाली खाली काम करावे लागते. किंबहुना 10 जनपथ त्यांना काम करू देत नाही. देशात बोकाळलेला भ्रष्टाचार ते दूर करू शकत नाहीत. ते स्वाभिमान दाखवून पंतप्रधान पदावरून बाजूला होत नाहीत, असे “परसेप्शन” संपूर्ण देशावर तयार झाले होते. “टाईम” मॅगेझिनने तर त्यांना “अंडर आचीव्हर” असे शिक्कामोर्तब करून बाजूला काढून टाकले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्याचे खापर सरकार प्रमुख म्हणून मनमोहन सिंग यांच्यावर फुटले. ते राजकीय वातावरण मनमोहन सिंग यांसाठी खूपच प्रतिकूल होते म्हणून त्यांचे मूल्यमापन “एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर, “अंडर अचीव्हर” वगैरे शब्दांच्या फटकाऱ्यांनी झाले होते, पण तेव्हा सुद्धा मनमोहन सिंग यांच्या वैयक्तिक बुद्धिमत्तेविषयी, क्षमतेविषयी आणि प्रामाणिकपणाविषयी कोणाच्याही मनात शंका नव्हती, पण राजकीय परिस्थिती आणि गांधी कुटुंबियांचा दबाव यांच्यामुळे ते अपेक्षित काम करू शकत नव्हते, हा मुख्य आक्षेप होता. ते भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत होते. किंबहुना भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता, अशी भावना संपूर्ण देशभर तयार झाली होती.
या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद सोडताना वर उल्लेख केलेले इतिहासच “न्याय” करेल हे उद्गार काढले होते. त्यांच्या हयातीत आणि ते कालवश झाल्यानंतर देखील खरे ठरले. इतिहास आणि वर्तमानाने मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन निष्णात अर्थतज्ञ, भारतीय अर्थव्यवस्थेचे सूत्रधार, भारतीय आर्थिक सुधारणा धोरणाचे अध्वर्यू, याच स्वरूपात केले. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डियन आदी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्यांच्या योगदानाविषयी भरभरून लिहिले. प्रगत आत्मनिर्भर भारताचा पाया रचणारे, भारताची अर्थव्यवस्था चीनशी स्पर्धा करू शकेल, या अवस्थेपर्यंत नेऊन ठेवणारे अर्थतज्ञ म्हणून त्यांचा गौरव केला.
भारतात देखील त्यांच्या योगदानाला सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आणि सगळ्या भारतीय जनतेने नमन केले. मनमोहन सिंग यांची शक्तीस्थळे, त्यांची क्षमता आणि त्यांची राजकीय मर्यादा हे सगळे लक्षात घेऊन त्यांचे प्रामाणिक आणि नम्र मूल्यमापन भारतीय राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आणि प्रामुख्याने भारतीय जनतेने केले. इतिहास आणि वर्तमानाने त्यांना “न्याय” दिला, जो त्यांच्या राजकीय गुरूंना निदान सुरुवातीच्या काळात तरी मिळू शकला नव्हता!!
Dr. Manmohan Singh: A Visionary Leader
महत्वाच्या बातम्या
- Governor : माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला मणिपूरचे, तर जनरल व्ही. के. सिंह मिझोरामचे राज्यपाल!!
- छगन भुजबळ ते अभयसिंहराजे भोसले; राष्ट्रवादीतल्या खच्चीकरणाचे किस्से, त्यांच्याच नेत्यांनी चव्हाट्यावर आणले!!
- Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोईने आता अमेरिकेत निर्माण केली दहशत!
- Delhi elections : दिल्ली निवडणुकीपूर्वी बांगलादेशी घुसखोरांचे दणादण बनवले जात होते मतदार कार्ड