विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हॅलो एव्हरीवन, हा व्हिडीओ तयार करताना मला खूप त्रास होत आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितेय की, कोरोनाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्याची लक्षणे वाईट आहेत. खूप वाईट आहेत. मला नीट बोलणेही शक्य होत नाही आहे. पण मला माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. हे भावूक शब्द आहेत एका गर्भवतीचे. जिचा काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला.पतीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. Do not take the corona lightly …”, emotional appeal from pregnant woman from the last video
जेव्हा घराबाहेर पडाल, कुणाशी बोलत असाल, तेव्हा प्लिज मास्क वापरा, कोरोनाविरोधातील लढाई ती हरली. मात्र अखेरच्या व्हिडीओमधून तिने लोकांना कोरोनापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने हा भावूक व्हिडीओ शेअर केला आहे. या महिलेचे नाव दीपिका . ११ एप्रिल रोजी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कोरोनाशी झुंजत असताना तिने १७ एप्रिल रोजी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला . मात्र नंतर तिची प्रकृती बिघडत गेली आणि २६ एप्रिल रोजी ती कोरोनाविरोधातील लढाई हरली. पती आणि अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलाला मागे सोडून तिने जगाचा निरोप घेतला.
या व्हिडीओत ती पुढे म्हणते की, तुम्ही मास्क अवश्य वापरा. मग तुम्ही घरात असा वा घराबाहेर मास्क जरूर वापरा. तुमच्या निकटवर्तीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क वापरा. मी अपेक्षा करते की, अशी वेळ कुणावरही येऊ नये. विशेष करून गर्भावस्थेमध्ये. कृपया आपल्या कुटुंबीयांना सांगा की, कोरोनाकडे दुर्लक्ष करू नका. त्याला अजिबात हलक्यात घेऊ नका. प्लिज, बेजबाबदार बनू नका.
दीपिकाचे पती रवीश चावला यांनी हा व्हिडीओ ९ मे रोजी ट्विटरवर शेअर केला होता. रवीश यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, ती पूर्णपणे मातृत्वासाठी समर्पित होती. ती तिच्या जन्म न झालेल्या बाळासह स्वर्गवासी झाली आणि साडेतीन वर्षांच्या मुलाला माझ्याकडे सोडून गेली. मदर्स डेच्या शुभेच्छा, दीपिका!