वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन हे मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात तिहार जेलमध्ये बंद आहेत. मात्र, त्यांना तिहार जेलमध्ये व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार आधीच झाली होती. परंतु, आता या व्हीव्हीआयपी ट्रीटमेंटचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये आरामात बिछान्यावर पडलेले सत्येंद्र जैन हे तेल लावून मसाज करून घेतानाचा हा व्हिडिओ आहे. Delhi Minister Satyendar Jain gets VVIP massage treatment in Tihar Jail
सत्येंद्र जैन आरामात बिछान्यावर पडले आहेत आणि एक व्यक्ती त्यांच्या पायाला तेल लावून मसाज करते आहे. त्यांचे पाय, पाठ दाबून देत आहे. त्याचबरोबर त्यांना एका स्टूल वर बसून त्यांच्या डोक्याचाही मसाज करतो आहे, असा हा व्हिडिओ आहे. सुरुवातीच्या व्हिडिओत सत्तेंद्र जैन आरामात बिछान्यावर पडून काही कागदपत्रे पाहत आहेत आणि ती दुसरी व्यक्ती त्यांच्या पायाला तेल लावून मसाज करत असल्याचे दिसत आहे.
हा व्हिडिओ जारी झाल्याबरोबर भाजपने आम आदमी पार्टी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. सत्येंद्र जैन यांना तुरुंगात असताना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिले जात असल्याचे आधीच बाहेर आले होते. आता त्याचे प्रत्यक्ष पुरावे आले आहेत. आम आदमी पार्टी आपल्या भ्रष्ट मंत्र्याची किती काळजी घेते हेच यातून दिसून येते, अशी टीकास्त्र भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोडले आहे.
काही फोटो आणि व्हिडिओ दाखवून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आधीच कोर्टात सत्येंद्र जैन यांच्या व्हीआयपी ट्रीटमेंट विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर तुरुंगातल्या काही अधिकाऱ्यांची बदली करून सत्येंद्र जैन यांच्या कोठडीची व्यवस्था बदलण्यात आली होती. परंतु आता व्हीव्हीआयपी मसाजचा व्हिडिओ समोर आल्यानंतर यात ठोस पुरावे उपलब्ध झाले आहेत. कोर्ट आता या संदर्भात नव्याने काय निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे.
ठग सुकेश चंद्रशेखरची तक्रार
सत्येंद्र जैन यांचा मसाजचा व्हिडिओ समोर येतात दक्षिणेतला ठग सुकेश चंद्रशेखर याचे पत्रही पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्याकडून शेकडो कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप केला आहे. हे पत्र त्याने दिल्लीच्या नायब राज्यपालांना पाठवले आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक
शिवाय सत्येंद्र जैन यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचा व्हिडिओ अशा वेळी समोर आला आहे, ज्यावेळी गुजरात विधानसभेच्या निवडणुका ऐन भरात आहेत. तेथे आम आदमी पार्टी आपले नशीब आजमावत आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये जाऊन तुम्हाला मोफत वीज, पाणी देतो अशा घोषणा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अनेक लोकांनी नकारात्मक उत्तरे दिल्याचे व्हिडिओ आधीच समोर आले आहेत. त्यात आता सत्तेंद्र जैन यांना तिहार जेलमध्ये केजरीवाल सरकार देत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटचे व्हिडिओ समोर आले आहेत. याचा निवडणुकीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दिल्ली सरकारचा दावा
सत्येंद्र जैन यांना विविध आजार असल्यामुळे त्यांना एक्यूप्रेशर थेरपी आणि अन्य उपचार देण्यात येत असल्याचा दावा दिल्ली सरकारने केला आहे. मात्र आता या व्ही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या व्हिडिओवर कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
Delhi Minister Satyendar Jain gets VVIP massage treatment in Tihar Jail
महत्वाच्या बातम्या
- ISRO ने रचला इतिहास; पहिले खासगी राॅकेट विक्रम-S प्रक्षेपित; वाचा वैशिष्ट्ये
- सावरकरांच्या अपमानापूर्वी आणि नंतर : उद्धव गटाची मध्यावधी निवडणुकीची पेरणी, ते आता महाविकास आघाडीत फुटीचा इशारा
- एसईबीसी उमेदवारांना आर्थिक दुर्बल आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- भगवान श्रीकृष्णाच्या बेट द्वारकेत 6.50 कोटींच्या जमिनीवर कब्जा; मशिदी, मजारींचे बांधकाम; 40 % अतिक्रमणांवर बुलडोझर