विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे एक्झिट पोल खोटे ठरण्याची आशा; अरविंद केजरीवालांनी घेतला सगळ्या 70 उमेदवारांचा मेळावा!!, असे आज दिल्लीत घडले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे उद्या निकाल आहेत, या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा ठरला.
दिल्लीचे मतदान संपल्यानंतर जे एक्झिट पोल आले, त्यामधून अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी पराभूत होणार आणि दिल्लीची सत्ता त्यांच्या हातातून निसटणार, असा निष्कर्ष समोर आला. तो निष्कर्ष अर्थातच केजरीवाल यांनी नाकारला. पण त्याचवेळी आम आदमी पार्टीच्या 16 भावी आमदारांना भाजपने फुटण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काल केजरीवालांनी केला. त्यामुळे आपले सगळे उमेदवार एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी आज दिल्लीतल्या सगळ्या 70 उमेदवारांची बैठक बोलावली. त्यामध्ये त्यांनी सगळ्या उमेदवारांचा “क्लास” घेतला. भाजप कोणकोणती अमिषे दाखवून आम आदमी पार्टीत फूट पाडेल याचे वर्णन करून सांगितले. त्याच वेळी त्यांनी आपले उमेदवार फुटणार नसल्याचाही निर्वाळा दिला.
दिल्लीची निवडणूक केजरीवालांच्या राजकीय भवितव्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे कारण त्यांचे वैयक्तिक राजकीय भवितव्य देखील त्यात पणाला लागले आहे. काँग्रेस किंवा भाजप यांचा दिल्लीच्या निवडणुकीत पराभव झाला, तर स्थानिक नेत्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होईल, पण दोन्ही पक्षांच्या केंद्रीय नेतृत्वावर त्या पराभवाचा दुष्परिणाम होणार नाही.
त्याउलट दिल्लीची सत्ता आम आदमी पार्टीच्या हातातून निसटली तर तो केजरीवाल यांच्या वैयक्तिक करिश्म्याचा पराभव असेल. त्यांची पार्टी फक्त पंजाब मध्ये सत्तेवर उरेल पण तिथल्या पक्षावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे केजरीवाल यांना जड जाईल. त्यामुळे एकूणच आम आदमी पार्टी वरची त्यांची पकड देखील ढिल्ली होईल. त्याचबरोबर केजरीवाल यांना Indi आघाडीत देखील राजकीय किंमत राहणार नाही. किंबहुना काँग्रेसची राजकीय किंमत ठेवू देणार नाही. त्यामुळे दिल्लीचा निकाल भाजप आणि काँग्रेस यांच्यापेक्षा केजरीवाल यांच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच आपला पक्ष आणि त्याची संघटना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यातलाच एक भाग म्हणून त्यांनी आज घेतलेल्या 70 उमेदवारांच्या बैठकीकडे पाहिले जात आहे.