विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सीबीएसई बारावीच्या प्रस्तावित परीक्षा रद्द करणे किंवा पर्यायी निर्णय घेणे, तसेच बारावीनंतर होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर केंद्राची एक उच्चस्तरीय बैठक आज होणार आहे. Decision regarding CBSC exams will be taken today
कोरोनाची दुसरी लाट आणि पाठोपाठ आलेल्या काळी बुरशी अर्थात ब्लॅक फंगस या साथींच्या पार्श्व भूमीवर यंदा बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा पूर्ण रद्द कराव्यात, यासाठी पालकवर्ग आणि शाळांकडून दबाव वाढला आहे. शिक्षणक्षेत्रातील नामवंतांनीही बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षांसाठी केंद्रांवर बोलावून लाखो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये, या मागणीची व्यवहार्यता आणि निकड पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोचवली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक होणार आहे.
त्यानंतर बारावी बोर्डाच्या परीक्षांबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. बैठकीत विविध राज्यांकडून आलेल्या सूचना आणि प्रस्तावांचा अभ्यास करून केंद्र सरकार याबाबत निर्णय घेईल. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या ऑनलाइन बैठकीत माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, महिला, बालविकास मंत्री स्मृती इराणी हे केंद्रीय मंत्रीही सहभागी होणार आहेत.