वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही अनेक डॉक्टरांसह 32 आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे रुग्णालयात घबराट पसरली असून लसीच्या परिणामकारकतेबद्दल शंका व्यक्त होत आहे. Corona Infected 32 people, including doctors at the AIIMS hospital
यापूर्वी लस घेतल्यानंतर दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टर्सना गुरुवारी कोरोना झाला होता. त्यानंतर एम्स रुग्णालयातील डॉक्टरना लस घेतल्यावर कोरोना झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
लसीकरण हाच सध्या उपाय
कोरोनाचा वेग प्रचंड आहे. त्याला लगाम घालण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. जास्तीत जास्त लोकांना लस दिल्यानंतर संसर्ग कमी होईल, असा विश्वास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान सचिव आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केला.
देशात 100 पैकी 9 जण बाधित
देशातील ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहिली तर छत्तीसगढ आणि महाराष्ट्रानंतर चंदिगड (10.6 टक्के) आणि पंजाब (10 टक्के) यांचा नंबर लागतो. देशात बाधित रुग्ण सापडण्याचा वेग वाढून 9.21 टक्के झाला. याचाच अर्थ देशातील 100 नागरिकांपैकी 9 जण बाधित होत आहेत.
हिंदुस्थानची अवस्था अमेरिकेसारखी; रुग्णसंख्या अचानक वाढली
कोरोनाच्या बाबतीत हिंदुस्थानची अवस्था आता अमेरिकेसारखी झाली आहे. अमेरिकेत गेल्या वर्षीच्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होत होती, परंतु ऑक्टोबरमध्ये त्यात अचानक वाढ झाली आणि डिसेंबरमध्ये तर एका महिन्यात 63.45 लाख रुग्ण सापडले होते. त्याचप्रमाणे हिंदुस्थानातही कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा अचानक वाढू लागली आहे. या वेगाला आवर घालता आला नाही तर हिंदुस्थानची अवस्था अमेरिकेपेक्षाही गंभीर होण्याचा धोका आहे.