वृत्तसंस्था
बांसवाड (राजस्थान) : देशातली काँग्रेस ही जुनी देशभक्त काँग्रेस उरलेली नाही. ती अर्बन नक्षलवाद यांच्या आणि माओवाद्यांच्या हातातले खेळणे बनली आहे. त्यामुळे ही काँग्रेस देशातल्या माता बहिणींच्या हक्काचे मंगळसूत्रांचे हिशेब करून त्यांचे सोने घुसखोरांना वाटेल, असा आत्तापर्यंतचा सर्वांत प्रखर हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर चढाविला. राजस्थानच्या बांसवाडमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची अक्षरशः चिरफाड केली. Congress wants to snatch women’s Mangalsutra, gold; and distribute among those having more children
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशातली संपत्ती समान वाटण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यासाठी काँग्रेस देशातल्या माता भगिनींच्या सोन्याचा हिशेब करेल, आदिवासी कुटुंबांकडेच्या चांदीचा हिशेब करेल, देशातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपत्तीचा हिशेब करेल आणि ती सगळी देशात समान वाटण्याच्या नावाखाली घुसखोरांना दिली जाईल, ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि हेच मी तुम्हाला सांगायला आलो आहे, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका गंभीर वक्तव्याचा हवाला दिला. मनमोहन सिंग म्हणाले होते, या देशातल्या संपत्तीवर सर्वांत पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. काँग्रेसही त्याच विचारसरणीची असल्याने देशातल्या माता भगिनींच्या हक्काचे सोने, त्यांची मंगळसूत्रे यांचा हिशेब करून काँग्रेस त्याचे वाटप ज्यांना जास्त मुले आहेत म्हणजेच मुस्लिमांना करेल, त्यांच्या जाहीरनाम्यामध्येच त्यांनी ते उघडपणे नमूद केले आहे.
जे लोक काँग्रेस सोडून बाहेर पडत आहेत, ते अत्यंत गंभीरपणे काँग्रेसची सध्याची अवस्था वर्णन करत आहेत. काँग्रेस आता जुनी देशभक्त काँग्रेस उरलेली नाही. ती अर्बन नक्षलवाद्यांच्या आणि माओवाद्यांच्या पूर्ण कब्जात गेली आहे. त्यामुळेच माओवाद्यांचे सूत्र असलेल्या समान संपत्ती वाटपाच्या आधारे ते देशातल्या घुसखोरांना देशातल्या महिला भगिनींची संपत्ती वाटण्याच्या बेतात आले आहेत, असा गंभीर आरोप मोदींनी केला. त्याचवेळी केंद्रातले भाजप सरकार हे अजिबात घडू देणार नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला आणि कृतीला प्रखर विरोध करेल, असा निर्वाळाही मोदींनी दिला.
देशाच्या साधन संपत्तीवर मुस्लिमांचा हक्क
या देशाच्या साधन संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी खरंच केले होते. 9 डिसेंबर 2006 रोजी राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले होते. देशातल्या विकासाची फळे समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. विशेषतः वंचित घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे असे प्रतिपादन करताना मनमोहन सिंग यांनी देशाच्या साधन संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी देशात प्रचंड गदारोळ उठला होता.
देशातल्या वंचितांना किंवा अल्पसंख्यांकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना देशाच्या साधन संपत्तीत वाटा मिळाला पाहिजे, याविषयी कोणाचे दुमत नव्हते. परंतु देशातल्या साधन संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, हे मनमोहन सिंग यांचे वक्तव्य पक्षपाती स्वरूपाचे असल्याने त्यांच्याविरुद्ध संपूर्ण देशभर गदारोळ उठला होता. पंतप्रधान मोदींनी नेमक्या त्याच नसेवर बोट ठेवत काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चिरफाड केली.