विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एक्झिट पोल डिबेट वर बहिष्कार घालण्याचा निर्णय काँग्रेसने आज INDI आघाडीच्या बैठकीनंतर मागे घेतला. आता त्या डिबेट मध्ये भाग घेऊन काँग्रेसचे प्रवक्ते भाजपला, त्या पक्षाच्या इको सिस्टीमला आणि फिक्सिंग केलेल्या एक्झिट पोलला “एक्सपोज” करणार आहेत.
एक्झिट पोल डिबेट फक्त टीव्ही चॅनेलची टीआरपी वाढवतात. त्यासाठी टीव्ही चॅनेल वाले फिक्सिंग केलेले एक्झिट पोल दाखवतात. त्यामुळे त्या एक्झिट पोल डिबेट मध्ये काँग्रेस भाग घेणार नाही, असे पक्षाने काल धोरणात्मकरित्या जाहीर केले होते. पण त्यामुळे काँग्रेस चर्चेतून पळून गेली. काँग्रेसला पराभव दिसला. काँग्रेसला पराभवाचे खापर कोणावर फोडता येणार नाही म्हणून काँग्रेसचे प्रवृत्ती टीव्हीवरच्या डिबेटमध्ये येणार नाही, अशा शब्दांमध्ये भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसच्या निर्णयाची खिल्ली उडवली होती.
याचा परिणाम आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या INDI आघाडीच्या बैठकीत दिसला. आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांना एक्झिट पोल डिबेट पासून दूर जाणे योग्य नसल्याचा सल्ला दिला. उलट एक्झिट पोल डिबेटमध्ये सामील होऊन भाजपला जास्तीत जास्त “एक्स्पोज” करावे, असा सल्ला INDI आघाडीतल्या बाकीच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दिला. तो सल्ला काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ऐकला आणि एक्झिट पोल डेबिट वरचा पक्षाचा बहिष्कार मागे घेतला. काँग्रेसचे प्रवक्ते एक्झिट पोलवर झालेल्या डिबेट मध्ये सामील झाले.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी अखिलेश यादव, शरद पवार, फारूक अब्दुल्ला, तेजस्वी यादव, डी. राजा, अनिल देसाई हे नेते उपस्थित होते. परंतु उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, एम. के. स्टालिन हे प्रमुख नेते उपस्थित नव्हते. त्यामुळे INDI आघाडीच्या आजच्या बैठकीत कोणते नेते उपस्थित होते, यापेक्षा कोणते नेते उपस्थित नव्हते, या विषयावर प्रसारमाध्यमांमध्ये जास्त चर्चा झाली.