विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ashok Gehlot, Bhupesh Baghel महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर उद्भवू शकणारी कोणतीही परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेसने शुक्रवारी आपल्या सहा नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांची महाराष्ट्रासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Ashok Gehlot, Bhupesh Baghel
उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यात कोणचे सरकार येणार याबाबत दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे काँग्रेसने महाराष्ट्रात निरीक्षकांची नियुक्ती केली असून भूपेश बघेल, अशोक गेहलोत आणि जी परमेश्वरा यांच्यावर ही जबाबादारी सोपवण्यात आली आहे. तर झारखंडच्या निरीक्षपदी तारीक अन्वर, मल्लू भाटी आणि कृष्णा अलावुरु यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
घोडेबाजार टाळण्यासाठी मविआ सतर्क
एक्झिट पोलने आघाडी महाविकास आघाडीची चिंता वाढवली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र अशा एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही, असे म्हणत महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा दावा मविआच्या नेत्यांनी केला आहे. आज महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांशी बोलून एकत्र राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच घोडेबाजार अथवा आमदार फुटू नये यासाठी शनिवारी निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या सर्व आमदारांना एकाच ठिकाणी ठेवण्याची तयारीही सुरू आहे.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान झाले
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. राज्यातील 36 जिल्ह्यांतील सर्व 288 जागांवर एकूण 66.05 टक्के मतदान झाले. तर 2019 मध्ये महाराष्ट्रात एकूण 61.44 टक्के मतदान झाले होते. यावेळी महाराष्ट्रात मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच मानली जात आहे.
निवडणुकीपूर्वी दिली होती ‘ही’ जबाबदारी
महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने अशोक गेहलोत यांची मुंबई आणि कोकण विभागातील वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. तर भूपेश बघेल यांना विदर्भात (अमरावती आणि नागपूर) वरिष्ठ निरीक्षक करण्यात आले. दोन्ही नेते मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव लक्षात घेऊन पक्षाने त्यांना ही मोठी जबाबदारी दिली आहे.