विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर इंदिरा गांधींची आठवण करून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोचले, पण त्याच वेळी काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि पी. चिदंबरम यांनी मात्र मोदींच्या निर्णयाची वाखाणणी केली. त्यामुळे काँग्रेस मधली दुफळी समोर आली.
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भारताने पाकिस्तानशी शस्त्रसंधी करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. पाकिस्तानी शस्त्रसंधी तोडल्यावर भारतानेही प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर थांबविले नसल्याचे भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले.
पण या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मात्र इंदिरा गांधींची आठवण काढून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोचले. काँग्रेसच्या मुख्यालयासमोर इंदिरा गांधी होना आसान नही अशी मोठी पोस्टर्स झळकवली. इंदिरा गांधींनी 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे केले. स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती केली, याची आठवण कपिल सिब्बल आणि सचिन पायलट यांनी मोदींना करून दिली. अफगाणिस्तानला हरवायला अमेरिकेला 20 वर्षे लागली, पण इंदिरा गांधींनी 13 दिवसांमध्ये पाकिस्तानचा पराभव केला, असे राहुल गांधींचे भाषण केलेल्या व्हिडिओ काँग्रेसने जारी केला.
पण काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाची स्तुती करून काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याला छेद दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिशय बुद्धिमत्ता दाखवून शस्त्रसंधी करायचा संतुलित निर्णय घेतला, असे चिदंबरम यांनी इंडियन एक्सप्रेसच्या लेखात लिहिले, 1971 आणि 2025 मधली भारत आणि पाकिस्तान यांची परिस्थिती फार भिन्न आहे. भारताने दीर्घकालीन युद्ध लढण्यापेक्षा आपले लक्ष आर्थिक प्रगतीवर केंद्रित केले पाहिजे. तेच मोदींनी केले, असे मत शशी थरूर यांनी व्यक्त केले.
भारताला दहशतवाद्यांची लाँच पॅड्स उद्ध्वस्त करायची होती. ती भारतीय सैन्य दलाने केली. भारतीय सैन्य दलाने अचूक हल्ले करून पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेचे कंबरडे मोडले म्हणूनच पाकिस्तानला शस्त्रसंधी करणे भाग पडले याकडे शशी थरूर आणि चिदंबरम यांनी लक्ष वेधले.