नाशिक : जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनासाठी खानावळी; डॉ. मोहन भागवत यांनी सांगितली त्यांची कहाणी!!, असे आज राजधानी नवी दिल्लीत घडले. संघाच्या संवाद कार्यक्रमात आज प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. या प्रश्नोत्तरांमध्ये अनेकांनी संघ आणि भाजप संघ आणि इतर राजकीय पक्ष यांच्यातल्या संबंधांविषयी प्रश्न विचारले. त्यामध्ये संघ भाजपला मदत करतो, पण इतर राजकीय पक्षांना का मदत करत नाही??, असा एक प्रश्न होता.
संघ फक्त भाजपला मदत करतो एवढेच अनेकांना दिसते, पण अनेकदा देशाशी संबंधित चांगल्या गोष्टी करण्यासाठी आणि अगदी राजकीय पक्षांसाठी काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी संघाने मदत केल्याची उदाहरणे आहेत, असे डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.
या संदर्भात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडिया अर्थात NSUI च्या नागपूर अधिवेशनातील कहाणी विस्ताराने सांगितली. 1984 मध्ये नागपूरला ते अधिवेशन झाले होते. राजीव गांधी अध्यक्ष होते. त्यावेळी तिथे सुमारे 30000 प्रतिनिधी आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या प्रतिनिधींसाठी NSUI ने केलेली भोजन व्यवस्था अपुरी ठरली. त्यावेळी अधिवेशनात मोठा गोंधळ उडाला. मारामाऱ्या झाल्या. अधिवेशनातले अनेक लोक बाजारात काही खायला मिळते का म्हणून लुटायला बाहेर पडले, पण त्यांना मार खावा लागल्यामुळे ते परत आले. अधिवेशन स्थळी भोजन व्यवस्था तर अपुरी पडली होती. त्या वेळच्या नागपूरच्या खासदारांनी (बनवारीलाल पुरोहित) मोहन भागवत यांना फोन केला होता. त्यावेळी भागवत नागपूरचे प्रचारक होते. अधिवेशन स्थळी मेस चालवायला कुणी नाही. संघ त्या मेस चालवू शकतो का??, अशी विचारणा नागपूरच्या खासदारांनी भागवतांकडे केली. त्यावेळी भागवतांनी त्यांना होकार दिला. अधिवेशन स्थळी 11 मेस होत्या. त्यापैकी 7 मेस संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू करून चालविल्या होत्या, अशी आठवण भागवतांनी सांगितली.
भागवतांनी सांगितलेल्या कहाणीच्या पलीकडच्या आठवणी
डॉ. मोहन भागवत यांनी फक्त NSUI संघटनेच्या अधिवेशनाची आठवण सांगितली. पण त्या पलीकडे जाऊन संघ आणि काँग्रेस यांच्या सहकाऱ्याच्या अनेक आठवणी विविध पुस्तकांमध्ये विखुरलेल्या आहेत. 1965 च्या पाकिस्तान विरुद्ध च्या युद्धात तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी त्या वेळचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्याकडे सहकार्याचा हात मागितला होता. त्यानुसार संघाने सरकारला आवश्यक ते सगळे सहकार्य केले होते.
1980 च्या लोकसभा निवडणुकीत देशात स्थिर सरकार यावे यासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी इंदिरा गांधींना मदत केल्याच्या आठवणी अनेक पुस्तकांमध्ये नमूद आहेत. त्याचबरोबर 1984 च्या जम्मू - काश्मीरच्या निवडणुकीत संघाच्या स्वयंसेवकांनी राजीव गांधींना मदत केली होती, त्याच्याही आठवणी अनेक पुस्तकांमध्ये अनेक पत्रकारांनी नमूद केल्यात.
Congress’ NSUI convention; Dr. Mohan Bhagwat tells his story!!
महत्वाच्या बातम्या
- Mohan Bhagwat संघाला विरोध कमी होण्यामागे प्रेमाची शक्ती, मोहन भागवत यांचे प्रतिपादन
- BJP States : भाजपशासित राज्यांनी म्हटले- न्यायालय विधेयकांना मान्यता देऊ शकत नाही, हा फक्त राज्यपाल किंवा राष्ट्रपतींचा अधिकार
- गणपतीच्या पहिल्या दिवशी झाली बंधूंची भेटीगाठी; पण फोटोला पोज देताना घातली हाताची घडी!!
- Ganesh festival in other parts of the world : पहा जगातील कोणत्या कोणत्या देशात गणेशोत्सव साजरा होतो ?