नाशिक : काँग्रेस आणि काँग्रेसच्या संस्कृतीतले पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. कारण सत्ता त्यांच्यासाठी “ऑक्सिजन” सारखी असते. फार मोठा राजकीय संघर्ष करून सत्तेवर येण्याची काँग्रेस आणि काँग्रेस संस्कृतीतील पक्षांच्या नेत्यांना सवय नाही, त्याऐवजी पक्षांतर करून सत्तेच्या वळचणीला येऊन बसणे ही त्यांना अधिक सोयीचे वाटते. याचे प्रत्यंतर सध्या महाराष्ट्रात येत आहे. Congress Muslim mlas in Mumbai contemplating to enter ajit pawar’s “secular” NCP to capture power share!!
शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसल्याबरोबर काँग्रेसच्या आमदारांनाही भाजपच्या सत्तेची “तहान” लागली, पण काही काँग्रेस आमदारांना भाजप आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाची “ऍलर्जी” असल्याने त्यांना काँग्रेसमध्येच राहण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता अजित पवारांचा राष्ट्रवादीचा “सेक्युलर” पर्याय उपलब्ध झाल्यानंतर त्या “सेक्युलर” राष्ट्रवादी प्रवेश करून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्याचा मनसूबा काँग्रेसच्या मुंबईतल्या मुस्लिम आमदारांनी आखल्याची बातमी आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याबरोबर काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ मुंबईतील काँग्रेसचे काही नेते सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात आहेत. माजी मंत्री आणि आमदार बाबा सिद्दीकी लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सिद्दिकी सध्या वांद्रे पूर्वेतून आमदार आहेत. तेदेखील वडिलांपाठोपाठ काँग्रेस सोडू शकतात. 31 वर्षांचे झीशान पहिल्या टर्मचे आमदार आहेत. त्यांनी पक्षांतराची शक्यता नाकारली, पण अजित पवार आपल्या कठीण काळात सोबत राहिल्याचे सांगून त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्र “सेक्युलर” राष्ट्रवादीचा पर्याय आपल्यापुढे खुला असल्याचेच सूचित केले.
मुंबईतील आणखी दोन मुस्लिम नेते काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची बातमी हिंदुस्तान टाईम्सने दिली. मुंबादेवीचे आमदार अमिन पटेल आणि मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मुंबईत काँग्रेसचे केवळ 4 आमदार आहेत. आमदार झीशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची मध्यंतरी ईडीकडून चौकशी झाली, तर अस्लम शेखही ईडीच्या रडारवर आहेत. अमिन पटेल हे मिलिंद देवरांचे निकटवर्तीय मानले जातात. देवरांनी काँग्रेस सोडल्यानंतर ते सध्यातरी काँग्रेसमध्येच आहेत. पण या 3 आमदारांनी काँग्रेसची साथ सोडल्यास मुंबईत धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड याच फक्त काँग्रेसचा एकमेव आमदार उरतील.
काँग्रेससाठी 1995 चे हे वॉटरर्लू असेल. कारण 1995 च्या निवडणुकीत मुंबईतल्या 34 जागांपैकी काँग्रेसचा फक्त एक आमदार निवडून येऊ शकला होता.
प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आरिफ नसीम खान यांनाही सत्ताधारी पक्षाची ऑफर होती. मात्र त्यांनी काँग्रेस सोडण्यास नकार दिला. सिद्दिकी आणि शेख सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात आहेत. 27 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीआधी किंवा 20 मार्चला राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता होण्यापूर्वी त्यांना आपल्याकडे घेण्याचा भाजपचा प्लॅन आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याने दिली.
काँग्रेसचे 15 आमदार कुंपणावर आहेत. पुढील महिनाभरात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळतील, असा दावा या नेत्याने केल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली.
मिलिंद देवरांचे निकटवर्तीय अमीन पटेल शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले नाहीत. ते काँग्रेससोबतच आहेत. शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका त्यांच्यासाठी अडचणीची आहे. अमीन पटेल यांनी काँग्रेस सोडण्याची चर्चा फेटाळून लावली, पण भविष्यातील राजकीय प्लॅनबद्दल स्माईलीने उत्तर दिले. यातच त्यांच्या राजकीय भवितव्याचा मेसेज दडला आहे!!
मुंबईत काँग्रेसला आणखी कमकुवत करण्यासाठी भाजपा आणि एकनाथ शिंदेंचे प्रयत्न सुरू आहेत, पण मुस्लिम नेत्यांना मात्र सत्तेची वळचण खुणावते आहे. पण सत्ताधारी तीन पक्षांपैकी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हिंदुत्ववादी असल्याने काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांची “अडचण” होत होती. पण आता अजित पवार सत्तेच्या वळचणीला गेल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीचा सेक्युलर पर्याय मुस्लिम नेत्यांना खुला झाल्याने सत्तेच्या वळचणीचा मार्ग सोपा झाल्याचा त्यांचा होरा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नाही. त्यामुळे काँग्रेसचे आमदार आपल्या राष्ट्रवादीच्या गळाला लावून ते मुंबईत स्वत:चा प्रभाव निर्माण करू शकतात.
मुंबईतील 36 पैकी 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतांचे प्रमाण लक्षणीय असल्याने त्यांच्या पक्षाचा फायदाही होऊ शकतो आणि ते शरद पवारांच्या उरलेल्या राष्ट्रवादीवर कुरघोडी करू शकतात.
– पुन्हा निवडून येण्यासाठी सत्तेचाच पर्याय
त्याचबरोबर आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबईतल्या मुस्लिम आमदारांना पुन्हा निवडून यायचे असेल, तर काँग्रेस संघटनात्मक पातळीवर आता फारशी उपयोगी उरलेली नाही. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीचा “सेक्युलर” पर्याय निवडून सत्तेच्या वळचणीला येऊन आपल्या पुढच्या निवडणुकीची आर्थिक बेगमी करणे अधिक योग्य ठरेल, असा या मुस्लिम आमदारांचा होरा आहे, पण भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना काँग्रेस आमदारांच्या या प्रयत्नांना कसा प्रतिसाद देतात??, यावर त्यांचे राजकीय भवितव्य खऱ्या अर्थाने अवलंबून आहे.
Congress Muslim mlas in Mumbai contemplating to enter ajit pawar’s “secular” NCP to capture power share!!
महत्वाच्या बातम्या
- उत्तराखंड सरकारला समितीने UCC ड्राफ्ट सादर केला; मुख्यमंत्री धामी म्हणाले- बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती
- INDI आघाडी शिल्लकच नाही; महाविकास आघाडीच्या बैठकीला जाऊन आल्यावर प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य!!
- छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या सोडल्या पुड्या; फडणवीसांनी काढली सुळे – दमानियांची हवा!!
- राहुल गांधींच्या plural politics ची परिणीती कुठे पोहोचली, ते पहा; काँग्रेसचाच खासदार स्वतंत्र दक्षिण भारत देश मागू लागलाय बघा!!