नाशिक : अनेकदा लंब्या चवड्या भाषणांपेक्षा एखादा फोटो किंवा एखादा छोटा व्हिडिओ खरे बोलून जातो, याचा प्रत्यय आज अहमदाबादेत काँग्रेसच्या महाअधिवेशनात आला. महाअधिवेशनाच्या मुख्य मंचावर काँग्रेसच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचे स्वागत करताना गुजरात प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हातात छत्री दिली, तर काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या मस्तकावर छत्र धरले!! काँग्रेस अधिवेशनाचे नेमके स्वरूप दर्शविणारे हे मुख्य चित्र ठरले!!
काँग्रेसचे महाअधिवेशन गांधी + पटेल यांच्या गुजरात मध्ये होत आहे हे लक्षात घेऊन गुजरात मधल्या आदिवासी कार्यकर्त्यांनी पारंपारिक पद्धतीने छत्री आणि छत्र तयार करून घेतले. ते गुजरातमधल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधींना प्रदान केले. पण त्यातून काँग्रेसवर नेमकी छाप कुणाची??, हे सगळ्या जगासमोर उघड दिसले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृह राज्य गुजरात मधूनच त्यांच्या केंद्रातल्या राजवटीला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने अहमदाबाद मध्ये महाअधिवेशन घेतले. तिथे पक्षाने नेहरू + इंदिरा यांचा जयजयकार करण्याऐवजी गांधी + पटेल यांचा जयजयकार केला. पण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सगळ्या अध्यक्षीय भाषणामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याच राजकीय कर्तृत्वाची छाप राहिली. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेद्वारे आणि भारत जोडो न्याय यात्रेद्वारे उभा आडवा भारत पिंजून काढला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 99 खासदार निवडून आले. राहुल गांधींच्या या यात्रांचा परिणाम काँग्रेसच्या परफॉर्मन्सवर झाला. याचा प्रमुख उल्लेख मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणात केला. त्याचबरोबर काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस संघटनेने कशी दमदार वाटचाल केली, याचे सविस्तर वर्णन केले.
इथून पुढे काँग्रेस जिल्हाध्यक्षांना संघटनात्मक पातळीवर महत्त्व देऊन निवडणुकीच्या तिकीट वाटपात देखील सहभागी करून घेणार असल्याचे खर्गे यांनी सांगितले. ही सगळी योजना राहुल गांधी यांनी तयार केल्याचे त्यांनी नमूद केले. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या सगळ्या भाषणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याच राजकीय कर्तृत्वाची छाप दिसली. मोदी सरकारवर टीका करताना देखील खर्गे यांनी राहुल गांधींचेच बरेच मुद्दे रिपीट केले. त्यात प्रामुख्याने जातनिहाय जनगणनेचा मुद्दा त्यांनी लावून धरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण बॅकवर्ड असल्याचे सांगतात, पण ते दलित, पिछडे, आदिवासी समाजासाठी काम करत नाहीत. जातनिहाय जनगणना करून त्यांना न्याय देत नाहीत, अशी टीका खर्गे यांनी केली.
पण खर्गे यांच्या या भाषणापेक्षा वर उल्लेख केलेले आणि दाखविलेले छायाचित्रच काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निमित्ताने गाजले. काँग्रेसच्या अध्यक्षपदावर गांधी परिवारापैकी कोणीही नको, असा निर्णय सोनिया गांधींनी घेतला. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाध्यक्ष पदाची संधी मिळाली. पण म्हणून सोनिया गांधी किंवा राहुल गांधी आणि अगदी प्रियांका गांधी यांची काँग्रेस वरची छाप पुसू शकली नाही. उलट ती अधिक गडद होत गेली. याचेच चित्र काँग्रेस महाअधिवेशनाच्या मुख्य मंचावर ठळकपणे दिसले. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावर मल्लिकार्जुन खर्गे असले तरी खरे राजकीय महत्त्व कुणाला आहे आणि महत्त्वाचे सगळे राजकीय निर्णय कोण घेतो, हे लक्षात घेऊनच गुजरात प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हातात छत्री दिली आणि सोनिया गांधी यांच्या मस्तकावर छत्र धरले.
Congress leaders re-enthroned Sonia Gandhi as it’s leader
महत्वाच्या बातम्या