• Download App
    Congress leaders ठाकरेंच्या दिल्लीत गांधी परिवाराशी भेटीगाठी; पण काँग्रेसची ठाकरे + पवार दोघांवर कुरघोडी!!

    ठाकरेंच्या दिल्लीत गांधी परिवाराशी भेटीगाठी; पण काँग्रेसची ठाकरे + पवार दोघांवर कुरघोडी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीपासून गल्लीपर्यंत इतर कुठल्याही नेत्यांना मातोश्रीवर यायला भाग पाडण्याची बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा राखणे उद्धव ठाकरे यांना जमले नाही. त्यांना मातोश्री बाहेर पडून दिल्ली गाठावी लागली, हे खरे. पण उद्धव ठाकरे यांना राजकीय वास्तवाची जाणीव झाल्याने त्यांनी ते केले. मातोश्री सोडून दिल्ली गाठली. गांधी परिवाराची भेट घेतली. बाकीच्या काँग्रेस नेत्यांशी त्यांनी वाटाघाटी केल्या. हे सगळे गेल्या 3 दिवसांत घडले. पण उद्धव ठाकरे यांच्या शिष्टाईपुढे काँग्रेस नेते नमले नसल्याची बातमी आहे. Congress leaders over powered thackeray and pawar in maharashtra politics

    विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडीतील बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौरा केला. विधानसभेला अधिक जागा आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अशा दोन महत्त्वाच्या मागण्या घेऊन ठाकरे दिल्लीला गेले होते. पण या दौऱ्यातून त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे बोलले जात आहे.

    लोकसभेला काँग्रेसने ठाकरेंसमोर नमते घेतले. त्यांचे सगळे हट्ट पुरवले. सांगलीसारखी पारंपारिक जागा सोडली. पण तरीही ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत सर्वांत कमी स्ट्राईक रेट ठाकरेसेनेचा राहिला. अनेक महत्त्वाच्या जागा त्यांच्या पक्षाने गमावल्या. या सगळ्याची आठवण काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना दिल्ली दौऱ्यात करुन दिल्याचे समजते. काँग्रेसचे दिल्ली आणि राज्यातील नेते आता ठाकरेंसमोर नमते घेण्याच्या तयारीत नाहीत.



     

    उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी ठाकरेसेनेने केली. हा मुद्दा उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मांडला. पण त्यांची मागणी मान्य झाली नाही. भाजपचे नेते ठाकरे कुटुंबावर सातत्यानं आरोप करत आहेत. तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर केल्यास भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळेल. निवडणूक व्यक्तीकेंद्रीत होईल. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल, असे काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना सांगितले.

    लोकसभेला आपण पंतप्रधानपदाचा चेहरा न देता लढलो म्हणून आपल्याला चांगले यश मिळाले, याची आठवण देखील काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना करुन दिली. ज्याचे जास्त आमदार निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री, असेच सूत्र काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना सांगितले.

    जागावाटपात अधिक जागांसाठी आग्रह धरणाऱ्या ठाकरेंना काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेतील चुकांची आठवण करुन दिली. ठाकरेंच्या हट्टामुळे काँग्रेसनं सांगलीची जागा सोडली, पण तिथे काँग्रेसचा बंडखोर निवडून आला, ठाकरेंचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, संभाजीनगरसारख्या जागांवर शिवसेना कमी पडली. अनेक ठिकाणी उमेदवारांची निवड योग्य नव्हती, अशा चुकांचा पाढाच काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे यांना वाचून दाखविला.

    रायगडची जागा ठाकरेंनी जिंकली असती तर अजित पवार गट शून्यावर आला असता. सिंधुदुर्ग-रत्नागिरीत अधिक ताकद लावली असती, तर नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना चाप बसला असता. संभाजीनगरात मराठा आरक्षणाचा असलेला जोर पाहता तिथे मराठा उमेदवार द्यायला हवा होता. हातकणंगलेमध्ये अधिक जोर लावायला हवा होता, अशी लांबलचक यादी काँग्रेसच्या नेत्यांनी वाचली.

    लोकसभेला काँग्रेस राज्यात सर्वांत मोठा पक्ष ठरला. शरद पवारांनी केवळ 10 जागा लढवल्या. पण त्यातल्या ८ जागा निवडून आणल्या. काँग्रेसने थेट लढतीत भाजपच्या उमेदवारांना पाणी पाजले, तर शरद पवारांनी अजित पवारांना शह दिला. पण ठाकरेंचा स्ट्राईक रेट मात्र शिंदेसेनेपेक्षा कमी राहिला. या सगळ्याची आठवण करुन देत विधानसभेला काँग्रेस बॅकफूटवर येणार नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले.

    लोकसभेला अधिकच्या जागा दिल्या. पण विधानसभेला मात्र लोकसभेचा परफॉर्मन्स आणि सध्याच्या ताकदीच्या आधारेच जागावाटप होईल. निवडून येण्याची शक्यता असलेल्या जागाच दिल्या जातील. काँग्रेस स्वतःच्या हक्काच्या जागा सोडणार नाही. लोकसभेला केलेली तडजोड विधानसभेला होणार नाही, असा स्पष्ट संदेश काँग्रेसने ठाकरेंना दिल्याचे समजते. जिंकण्याची शक्यता असेल त्याच जागा घ्या अन् स्ट्राईक रेटवर लक्ष द्या, असे काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना स्पष्ट सांगितले. त्यामुळे विधानसभेला ठाकरेंना काँग्रेससोबत जुळवून घ्यावे लागेल.

    पण या भेटीतून काँग्रेसने पवारांना देखील संदेश दिला. ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या, तर तुमचेही मुख्यमंत्री पदाचे घोडे पुढे दामटलेले चालणार नाही, हा तो संदेश आहे.

    Congress leaders over powered thackeray and pawar in maharashtra politics

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र