विशेष प्रतिनिधी
देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय द्यायला निघालेल्या दोन पक्षांचे लोकप्रतिनिधी नुकतेच फुटले आहेत. काँग्रेस आणि नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल अर्थात जेडीयू पक्षाचे आमदार फुटले आहेत. जिल्हा परिषद सदस्यही फुटले आहेत. Congress – JDU splits : why Rahul Gandhi and Nitish Kumar are unable to keep its MLAs and ZP members together tied with the party?
अर्थातच या फुटीसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला यासाठी जबाबदार धरले आहे. मोठ्या प्रमाणावर पैसे वाटल्याचाही आरोप केला आहे. पण राजकीय मुद्दा त्या पलिकडचा अधिक महत्त्वाचा आहे. काँग्रेस आणि जेडीयू या दोन्ही पक्षांचे नेते ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रीय पातळीवर पर्याय देण्यासाठी जनतेचा विश्वास जिंकायला निघाले आहेत, त्यावेळी त्यांच्याच तिकिटांवर निवडून आलेल्या विविध राज्यांमधल्या लोकप्रतिनिधींचा त्या पक्षाच्या नेत्यांवर अर्थातच राहुल गांधी आणि नितीश कुमार यांच्यावर विश्वास का उरलेला नाही?? दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी आपापले पक्ष सोडून भाजपमध्ये का येत आहेत??, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
बिहारचे पडसाद मणिपूर, दमण दीव मध्ये
नितीश कुमार यांनी तर ज्यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी करत परत बिहारमध्ये सरकार बनवले. भाजपची मैत्री तोडली. आपले सर्व 41 आमदार घेऊन नितीश कुमार भाजपच्या युतीमधून बाहेर पडले. बिहार मधले सरकार त्यांनी जरूर बदलून दाखवले, पण त्याचे पडसाद मणिपूर सारख्या छोट्या राज्यांमध्ये देखील उमटले. तिथले आमदार फुटले आणि ते भाजपमध्ये सामील झाले. इतकेच नाही तर बिहार पासून दूर असणाऱ्या दादरा नगर हवेली दमण दीव मध्ये देखील जेडीयू पक्षाची अख्खी कार्यकारणी पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये समाविष्ट झाली. जेडीयूच्या तिकिटावर निवडून आलेले 15 जिल्हा परिषद सदस्य फुटले, जिल्हा परिषदेत पूर्ण सत्तांतर झाले. मग नितीश कुमार यांनी बिहारमध्ये सत्ता बदल करून जी राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वाकांक्षा दाखवली तिला नेमका काय अर्थ उरला?? आपल्याच पक्षाचे बिहार सोडून बाहेरच्या राज्यांमधले आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांसारखे लोकप्रतिनिधी त्यांना टिकवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाही का?? भाजपवर पक्ष फोडण्याचे आरोप करणे ठीक, पण त्या पलिकडे जाऊन आपण स्वतःच तिकीट दिलेल्या लोकप्रतिनिधींचा आपल्यावर विश्वास नाही, या वस्तुस्थितीकडे नितीश कुमार यांच्यासारख्या नेतृत्वाला कसे दुर्लक्ष करता येईल??
काँग्रेसची दक्षिणेत यात्रा, गोव्यात फूट
जे नितीश कुमार यांचे, तेच राहुल गांधी यांचे देखील!! राहुल गांधी दक्षिणेत भारत जोडो यात्रेमध्ये मग्न आहेत काँग्रेससाठी अल्पसंख्यांक मतांची मजबूत बेगमी करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत केरळ आणि तामिळनाडू मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी अनेक चर्चेस आणि मशिदी यांना भेटी देखील दिल्या आहेत. आजच ते नारायण गुरु मंदिरात देखील गेले होते. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस संघटनेत जान फुंकण्याचा त्यांचा इरादा आहे. पण असा इरादा असताना गोव्यातले 8 काँग्रेस आमदार फुटले आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपशी ज्या पक्षाने बरोबरीने टक्कर घेतली, त्या काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार फुटल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर आगपाखड केली आहे. भाजपवर शरसंधान साधने सोपे, पण मूळात आपल्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांना काँग्रेस नेतृत्व पक्षामध्येच का टिकवून धरू शकले नाही?? हा प्रश्न महत्त्वाचा नाही का?? शिवाय विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांमध्ये काँग्रेसचे आमदार फुटले आहेत, हा मुद्दा लक्षात घ्यायला नको का??
काँग्रेस नेतृत्वाने बाहेरून आलेल्या मायकेल लोबोंसाठी पायघड्या घातल्या. निवडणूक निकालानंतर काँग्रेसने मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेते केले. काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयाला माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी विरोध केला होता. तेव्हापासून काँग्रेस फूटीचा धोका होता. तो पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आला नाही का??
गोव्यात काँग्रेसला बहुमत मिळाले नाही हे खरे पण पक्षाच्या तिकिटावर 11 आमदार निवडून येणे ही सोपी गोष्ट नव्हती, ती साध्य झाली होती, ही देखील वस्तुस्थिती आहे. पण गोव्यातील पराभवानंतर काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा घेतला, मात्र प्रदेश प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. निवडणुकीपूर्वीच पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते गुंडूरावांवर नाराज होते. त्यामुळे पक्षाने पी. चिदंबरम यांना काँग्रेसचे निरीक्षक म्हणून पाठवले होते.
नूतन प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याबाबतही पक्षात गटबाजी झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 4 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते. यावरही काँग्रेसने डॅमेज कंट्रोलच्या उपाययोजना केल्या नाहीत.
काँग्रेसने दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्यावर पक्षविरोधी कारस्थानाचा आरोप करत कारवाई केली होती. त्यावेळी काँग्रेसने आपले 5 आमदार फुटू नये म्हणून चेन्नईला हलवले होते.
2019 मध्ये काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांचाही सहभाग होता. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या सर्व बंडखोर आमदारांचा भाजपमध्ये समावेश केला होता.
पक्षफूटीचा अनुभव तरी उपाययोजना नाही
पक्षफुटीचा एवढा मोठ्या प्रमाणावर अनुभव असताना काँग्रेस नेतृत्वाने कोणतीच उपयोजना कशी केली नाही?? आपल्याच आपणच तिकीट देऊन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पक्षातच टिकवून ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?? हा मुद्दा लक्षात घ्यायला नको का??
नेते सिमेंटिंग फोर्स उरले नाहीत का?
कोणताही राजकीय पक्ष फुटला की सत्ताधारी पक्षाकडे अथवा त्या पक्षाच्या नेतृत्वाकडे बोट दाखवणे सोपे असते. पण आपल्या पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे नेतृत्व आपले लोकप्रतिनिधी टिकवून ठेवण्यास अपयशी ठरले!!, हा मुद्दा मात्र लक्षात घेतला जात नाही. काँग्रेस आणि संयुक्त जनता दल या दोन्ही नेतृत्वांच्या बाबतीत वर उल्लेख केलेला मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो. राहुल गांधी आणि नितीश कुमार हे नेते आपापल्या पद्धतीचे राजकारण करण्यात मग्न आहेत. पण त्याच वेळी त्यांचे लोकप्रतिनिधी मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, हेच या फुटी मधून दिसून येत आहे!
Congress – JDU splits : why Rahul Gandhi and Nitish Kumar are unable to keep its MLAs and ZP members together tied with the party?
महत्वाच्या बातम्या
- पाकमध्ये हिंदूंसाठी आवाज उठवल्याबद्दल पत्रकाराला अटक : अल्पसंख्याकांना पूर मदत छावण्यांमधून बाहेर काढले, फक्त मुस्लिमांसाठी जागा
- द फोकस एक्सप्लेनर : ममता, नितीश-अखिलेश आणि शरद पवार एकत्र आल्यास किती जागांवर होईल परिणाम, काय सांगतात आकडे? वाचा सविस्तर…
- नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा पीकेंच्या नावाची चर्चा, पुन्हा एकत्र येण्याची शक्यता
- १.५४ लाख कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला नेला, पण लाभ देशाला!!; वाचा अनिल अग्रवालांची ट्विट्स!!