विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना प्रत्यक्षात काँग्रेस हायकमांडला तो नेता निवडतानाच एका भीतीने ग्रासले आहे, ती म्हणजे कोणाही एका नेत्याची विरोधी पक्षनेते पदी निवड केली, तर दुसऱ्या नेत्याला राग येऊन महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष फुटेल. त्यामुळे काँग्रेस हायकमांड संधी असूनही महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता निवडत नसल्याची माहिती पक्षांतर्गत सूत्रांनी दिली आहे. Congress High Command fears party split in Maharashtra
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. पण विधिमंडळ पक्षात ती फूट अद्याप दाखवली जात नाही. स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपला सामील होऊन उपमुख्यमंत्री झाल्याने विरोधी पक्षनेते पद रिकामे आहे. ते काँग्रेसला मिळू द्यायचे नाही, असा चंग कदाचित शरद पवारांनी बांधून अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षात फूट पडल्याचे अधिकृत रीत्या दाखविले जात नाही.
पण त्याचबरोबर खुद्द काँग्रेसमध्येच विरोधी पक्ष नेते पदासाठी मोठी स्पर्धा असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यापैकी कोणालाही विरोधी पक्ष नेते केले, तर काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता किंबहुना भीती काँग्रेस हायकमांडला वाटत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याची निवड करणे हायकमांड टाळत आहे.
या संदर्भातला अनुभव काँग्रेस हायकमांडने पंजाब मध्ये आधीच घेतला. काँग्रेसमध्ये तिथे फूट पडली. काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. आणि आता आम आदमी पार्टीशी केंद्रात जुळवून घेताना राज्यातही काँग्रेसमध्ये असंतोष पसरला. या दुहेरी तावडीत काँग्रेस हायकमांड महाराष्ट्रात सापडू नये म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता मिळू देत नाहीत, असे पक्षांतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी विरोधी पक्षनेता निवडसाठी नावे दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता पदासाठी नाना पाटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांची नावे दिली आहे. राहुल गांधी यांना यातल्या एका नेत्याची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करायची आहे. राहुल गांधींकडून अजूनही नावाची घोषणा होत नसल्याने काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे.
राहुल गांधी यांना महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्रीची निवड करायची नसून विरोधी पक्षनेत्यांची निवड करायची आहे, असे विधान भवन परिसरात काही आमदार खासगीत बोलत आहेत. राहुल गांधी लवकरच विरोधी पक्षनेत्याची निवड करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते देतात. पण राहुल गांधी यांच्या निर्णयाने पक्ष तर फुटणार नाही ना? याची काळजी सुद्धा हायकमांड घेत आहे.
महाराष्ट्रात अजित पवारांसारखा निर्णय काँग्रेस मधील काही नेते घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुद्धा राहुल गांधींकडे असल्याची चर्चा आहे.
Congress High Command fears party split in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक विधानसभेतून भाजपचे 10 आमदार निलंबित; भाजप आणि जेडीएसने अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवला
- द फोकस एक्सप्लेनर : 11 पक्षांचे 91 खासदार NDA आणि ‘I.N.D.I.A.’ दोन्हींपासून अंतर राखून, तेच किंगमेकर बनणार? वाचा सविस्तर
- ऑस्ट्रेलियन समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली ‘त्या’ रहस्यमयी वस्तूबाबत ‘ISRO’ प्रमुख सोमनाथन यांचं मोठं विधान, म्हणाले…
- व्हिडिओ कांडात अडकलेल्या किरीट सोमय्यांच्या मदतीला आले जितेंद्र आव्हाड!!