सहा जागांचा अहंकार I.N.D.I आघाडी बुडवणार!!, अशी वेळ काँग्रेस प्रणित I.N.D.I आघाडीवर काँग्रेस नेतृत्वानेच आणली आहे. या सहा जागा म्हणजे कुठल्या लोकसभेच्या जागा नव्हेत, तर त्या मध्य प्रदेश विधानसभेतल्या सहा जागा आहेत. Congress adamant politics will drown I.N.D.I alliance
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने काँग्रेस कडून फक्त सहा जागांची अपेक्षा केली होती. त्यापलीकडे अखिलेश यादव यांची कोणती खरी महत्त्वाकांक्षा नव्हती, पण काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने आणि हायकमांडने अखिलेश यादव यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि आपले उमेदवार परस्पर जाहीर करून टाकले. त्यामुळे अखिलेश यादव चिडले आणि त्यांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात I.N.D.I आघाडी संपुष्टात आल्याची जणू घोषणा केली.
ही घोषणा तात्पुरत्या रागातून आल्याचे काही माध्यमांनी म्हटले असले तरी, वास्तवात अखिलेश यादव यांचा त्या वक्तव्यातला पुढचा भाग अधिक गंभीर आहे. काँग्रेस नेत्यांनी आम्हालाही सांगितलेच नव्हते की, आपली I.N.D.I आघाडी लोकसभा निवडणुकीपूर्ती मर्यादित आहे. विधानसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही हे आम्हाला जर आधी सांगितले असते, तर आम्ही आधीच विचार केला असता. पण तरीही हरकत नाही लोकसभा निवडणुका येतील त्यावेळी “ते” आमच्याकडे आल्यावर “बघता” येईल, असा इशारा अखिलेश यादव यांनी दिला आहे आणि या इशाऱ्यात I.N.D.I आघाडीच्या बुडत्या भवितव्याचे खरे राजाकीय इंगित दडले आहे.
वास्तविक काँग्रेस मध्य प्रदेशात इतर प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत प्रबळ आहे हे खरे, पण भाजपशी टक्कर घेताना काँग्रेस एवढीही प्रबळ नाही की अखिलेश यादव यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्याची फक्त सहा जागांची मागणी काँग्रेसने मान्य करू नये!! वास्तविक समाजवादी पार्टीसाठी काँग्रेसने त्या सहा जागा सोडल्या असत्या तर काँग्रेस हा मित्र पक्षांना आपल्या राजकारणात सामावून घेणारा पक्ष आहे अशी प्रतिमा तयार होऊन तिचा लाभ मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत झाला असताच, पण त्यापलीकडे जाऊन इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये एक विश्वास तयार झाला असता आणि तो विश्वास काँग्रेसला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कदाचित शंभरी पारही घेऊन गेला असता!!
… पण कमलनाथांचे “ते” वक्तव्य आड आले. “छोडो अखिलेश विखिलेश को”… आणि तिथेच खरी ठिणगी पडली. काँग्रेसने स्वतःच्याच राजकीय कर्तृत्वाने “इंडिया” आघाडीची स्वतःच बांधलेली बोट स्वतःच बुडवायला सुरुवात केली.
वास्तविक I.N.D.I आघाडीतल्या प्रादेशिक पक्षांबरोबर त्या त्या राज्यांमध्ये थोडाफार त्याग करून काँग्रेसला सीट अड्जस्टमेंट जरूर करता आली असती किंबहुना काँग्रेसची सध्याची “राजकीय तब्येत” पाहता त्या सपोर्ट सिस्टीमची काँग्रेसला गरजही आहे. त्यातून काँग्रेसला अपेक्षित असा अपेक्षित असा शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म फायदाही झाला असता. शिवाय तडजोड करण्यासाठीचे काँग्रेसला तडजोडीसाठी जास्तीत जास्त किती जागा सोडाव्या लागल्या असत्या तर ती संख्या निदान 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये 50 पेक्षा अधिक नाही. कारण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये बाकीच्या कोणत्याही प्रादेशिक पक्षांची निवडणूक लढवण्याची तेवढी ताकदही नाही.
तिथे अपवाद फक्त आम आदमी पार्टीचा ठरला असता. पण आम आदमी पार्टी तशीही स्वतःचेच घोडे पुढे दामटून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधच करत आली आहे. त्यामुळे काँग्रेसने त्या पक्षाकडे गांभीर्याने मित्र म्हणून बघितले नाही तरी चालू शकेल असते. पण अखिलेश यादव किंवा नीतीश कुमार किंवा एम. के. स्टालिन या नेत्यांच्या बाबतीत तसे नाही. त्यांच्याकडे जर काँग्रेसने गांभीर्याने पाहून राजकीय तडजोड केली, तर त्यामध्ये त्या प्रादेशिक नेत्यांच्या बरोबरीने काँग्रेसचाही दीर्घकालीन लाभच आहे. कारण त्या प्रादेशिक नेत्यांची ताकद विशिष्ट प्रदेशांमध्ये एकवटली असली तरी इतर प्रदेशांमध्ये काँग्रेसला मदत करण्यासाठी त्यांची ताकद निश्चित आहे.
मुख्य म्हणजे राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आपल्या मित्र पक्षांना सांभाळून घेते. प्रसंगी मित्र पक्षांसाठी “त्याग” करू शकते ही प्रतिमा काँग्रेसला खूप मोठा लाभ देऊन गेली असती. पण काँग्रेस नेतृत्वाने ती संधी गमावली.
याला कदाचित कर्नाटक मधला विधानसभा निवडणुकीतला मोठा विजय कारणीभूत ठरला असेल. कारण तिथे काँग्रेसने देवेगौडांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाशी युती न करता मोठ्या विजय मिळवला. पण काँग्रेसच्या त्या विजयात काँग्रेसच्या ताकदीरपेक्षा भाजपची कमजोरी किंवा राजकीय चुका अधिक होत्या, हे विसरता कामा नये. शिवाय धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भाजप यांनी कर्नाटक मधल्या पराभवातून योग्य धडा घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तडजोडही करून टाकली.
काँग्रेसला तशी संधी मध्य प्रदेशात होती. 234 पैकी सहा जागा सोडणे ही फार किरकोळ तडजोड होती, पण या तडजोडीतून काँग्रेसला दीर्घकालीन लाभ झाला असता. पण तो काँग्रेस नेतृत्वाला साध्य करता आला नाही.
काँग्रेस – भाजप मधला सध्याचा भेद
इथेच काँग्रेसच्या आणि भाजपच्या सध्याच्या राजकारणातला मुख्य भेद दिसतो. भाजप स्वतःची ताकद वाढवताना इतर पक्षांना भले फोडत असेल, *(तसे तर काँग्रेसही करत आली) पण ते करताना जास्तीत जास्त प्रादेशिक आणि त्यातही स्थानिक पक्षाच्या नेत्यांना भाजप आपल्यापासून फारसा दूर जाऊ देत नाही, म्हणूनच मोदींच्या नेतृत्वाखाली 38 पक्षांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी सध्या अस्तित्वात आहे. लोकसभा निवडणुकीत या सर्व पक्षांशी तडजोडी करताना भाजपला जास्तीत जास्त प्रत्येक पक्षाला 1 या निकषावर 38 जागा सोडाव्या लागतील किंवा जास्तीत जास्त 40 ते 45 जागा सोडाव्या लागतील, त्यापलीकडे भाजपला तडजोडीची गरज नाही. पण ही तडजोड करताना भाजप मित्र पक्षांना जोडून ठेवू शकतो, हा “पॉलिटिकल मेसेज” संपूर्ण देशभर जाईल. नेमका हाच मेसेज देण्याची संधी मध्य प्रदेशातून काँग्रेसकडे आली होती. त्यासाठी काँग्रेसने समाजवादी पार्टीशी तडजोड करायला हवी होती, पण ती न करता काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांचा खरा मित्र पक्ष होण्याची संधी गमावली आहे!!
Congress adamant politics will drown I.N.D.I alliance
महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या दिशेने; 25 ऑक्टोबर पासूनचा जाहीर केला कार्यक्रम!!
- काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याविरोधात भाजपाची निवडणूक आयुक्तांकडे तक्रार
- शुद्ध मनाच्या संधीचे सोने, 10 % EWS आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ!!
- महुआ मोईत्रा वादापासून TMCने राखले अंतर; म्हटले- जो वादात अडकला, त्यानेच बोलावे; निशिकांत दुबे यांची लोकपालकडे तक्रार