विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना मे आणि जून महिन्यांसाठी प्रति व्यक्ति पाच किलो अतिरिक्त धान्यसाठा मोफत मिळेल.Central govt. provides free ration
यामुळे आधीच कोरोना संकट आणि लॉकडाउन सदृश स्थितीमुळे बेजार झालेल्या गरीब कुटुंबांना पुढील दोन महिने अन्नधान्यापासून वंचित राहावे लागणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये गरीब कल्याण अन्न योजनेला निर्णयोत्तर मान्यता देण्यात आली. यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसह ७९.८८ कोटी लाभार्थ्यांना माणशी पाच किलो मोफत धान्य देण्यात येईल.
गहू तांदळाच्या वितरणाबाबत राज्यांमधील तसेच केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक वितरण विभाग निर्णय घेईल. तर धान्य साठा उचल आणि वितरणाला लॉकडाउनची स्थानिक स्थिती सोबतच मॉन्सून, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय होईल.
याअंतर्गत ८० लाख टन धान्यसाठा पुरवला जाऊ शकतो. सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे ८० कोटी लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो धान्य देण्यासाठी २५३३२.९२ कोटी रुपये अनुदानाची आवश्यकता आहे. यात तांदळासाठी ३६७८९.२ टन आणि गव्हासाठी २५७३१.४ प्रति टन खर्च अपेक्षित आहे.