वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशात संभल मध्ये जाणार मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारासाठी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे नेते योगी आदित्यनाथ सरकारला घेरत असताना आणि दोन्ही पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या कामकाजाला वेठीला धरले असताना बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची चांगलीच पोलखोल केली.
संभलमध्ये झालेल्या हिंसाचारास त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या नेत्यांना दोषी ठरवले. संभलमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे लोक मुस्लिमांच्याच दोन गटांमध्ये दंगल पेटवत आहेत. ते तुर्की आणि बिगर तुर्की यांच्यात वादाच्या ठिणग्या टाकतात, असा आरोप मायावती यांनी पत्रकार परिषदेत केला.
बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या, “काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे खासदार संसदेत देशाचे आणि जनहिताचे मुद्दे मांडत नाहीत. त्यांना लोकांच्या कल्याणासाठी आस्था नाही ते स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी संभल हिंसाचाराच्या निमित्ताने मुस्लिम मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. संभलमध्ये ते तुर्की आणि बिगर तुर्की यांच्यात वादाच्या ठिणग्या टाकत आहेत. त्यांचा इतर मुद्द्यांशी काहीही संबंध नाही. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्या नेत्यांपासून मुस्लिम समाजानेही सावध राहिले पाहिजे, असा इशारा मायावती यांनी दिला.