वृत्तसंस्था
मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. चीनप्रमाणेच त्यांनीही आता अमेरिकेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. Bladimir Putin targets USA for afghan debacle
ते म्हणाले अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या २० वर्षांच्या मोहिमेचा शेवट फक्त शोकांतिका अन् फक्त हानीत झाला. युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने आपले नियम लादण्याचा प्रयत्न दोन दशके केला. हा प्रकार व्यर्थ ठरला. यातून अमेरिकेची केवळ हानीच झाली. याहून जास्त नुकसान अफगाण भूमीवर राहणाऱ्या जनतेचे झाले. कोणतीही गोष्ट बाहेरून लादणे अशक्य असते.
इतर देशांवर त्यांची मूल्ये लादण्याच्या प्रयत्नांबद्दल पुतीन यांनी पाश्चात्त्य देशांच्या नेहमीच टीका केली आहे. अफगाणिस्तानबाबत अमेरिकेच्या धोरणावरही त्यांनी टीका केली आहे. पाश्चात्त्य देश अफगाण निर्वासितांना रशियाची मैत्री असलेल्या मध्य आशियातील देशांत घुसविण्याचा प्रयत्न करीत असल्याची दावाही पुतीन यांनी केला आहे.
अफगाणिस्तानबाबत ढवळाढवळ करणार नाही असे पुतीन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. सोव्हिएत महासंघाच्या काळात त्या देशावर ताबा मिळविण्यात आला होता. त्यापासून धडे घेतल्याचे पुतीन यांनी सांगितले. त्यामुळे काबूलमधील नव्या नेतृत्वाबाबत रशियाने फक्त सावधपणे आशावादी दृष्टिकोन ठेवला आहे.