प्रतिनिधी
पणजी : गोव्यात भाजपने काँग्रेसवर मात करूनही मुख्यमंत्री पदाचा निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग भाजपने काँग्रेसच्या स्टाईलने आज मिटवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वजित राणे यांची “समजूत” काढून त्यांनाच अखेर मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडायला लावला आणि गोव्यात डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.BJP’s footsteps on Congress in Goa
पक्षाचे केंद्रीय निरीक्षक जी. किशन रेड्डी, नरेंद्र सिंग तोमर आणि देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे यांच्यात स्पर्धा होती. विश्वजित राणे यांनी गेले तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. अमित शहा यांनी त्यांची “समजूत” काढली आणि आज डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. विश्वजित राणे यांना उपमुख्यमंत्रीपद विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात येणार आहे.
डॉ प्रमोद सावंत यांनी आपल्या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे विशेष आभार मानले आहेत.
– ही तर काँग्रेस स्टाईल!!
ज्या पद्धतीने विश्वजित राणे यांची “समजूत” काढून त्यांना डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करणे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने भाग पाडले… ही मूळ पद्धत काँग्रेसची आहे. इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेस हायकमांड देखील मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धकालाच समोरच्या नेत्याच्या नावाचा प्रस्ताव मांडायला लावत असे. त्यामुळे काँग्रेस पक्षात एकमत असल्याचा संदेश समाजात जातो, असे काँग्रेस हायकमांडने मत होते. त्यामुळे दोन गटांमध्ये भांडणे लावून शेवटी प्रतिस्पर्धी गटाच्या नेत्यालाच मुख्यमंत्रीपदाचा नावाचा प्रस्ताव मांडण्याची “संधी” काँग्रेस हायकमांड देत असे. तोच मार्ग आज भाजप हायकमांडने अवलंबले असे दिसून आले. स्पर्धक विश्वजित राणे यांनाच डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडायला लावण्यात आला. अर्थातच तो एकमताने नंतर मंजूर करण्यात आला.