वृत्तसंस्था
झाशी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर एकीकडे हल्लाबोल सुरू केला असतानाच उत्तर प्रदेशातून त्यांना प्रतिसाद देत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशातून भाजप सत्तेवरून जाईलच, पण राज्यातली जनता काँग्रेसला पूर्णपणे नाकारेल आणि त्यांना विधानसभा निवडणुकीत 0 (शुन्य) जागा मिळतील, अशा शब्दात अखिलेश यादव यांनी हल्लाबोल केला आहे.BJP will lose power in U P, but. Congress will get 0 seats; claims akhilesh yadav
बुंदेलखंड मध्ये झाशीत समाजवादी विजय यात्रा पोहोचल्यानंतर त्यांनी मोठ्या रॅलीला संबोधित केले. त्यावेळी अखिलेश यादव म्हणाले, कि समाजवादी पक्ष फक्त 22 महिन्यांमध्ये एक्सप्रेस वे बांधू शकतो पण भाजपला एक्सप्रेस वे बांधायला साडेचार वर्षे लागतात कारण त्यांना जनतेसाठी कामच करायचे नाही. त्यांना फक्त बुलडोझर चालवायचे माहिती आहे. बुंदेलखंडतून यावेळी भाजप तर पूर्णपणे उखडून फेकली जाईलच, पण संपूर्ण उत्तर प्रदेशातून जनता काँग्रेसला देखील नाकारले. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत 0 (शुन्य) जागा मिळतील, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.
अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांच्या सारखेच धोरण अवलंबले असून भाजपवर प्रखर हल्ला चढवताना ते काँग्रेसलाही सोडताना दिसत नाहीत. लखीमपुर हिंसाचाराचा मुद्दा अखिलेश यादव यांच्यापेक्षा प्रियांका गांधी यांनी लावून धरला होता. त्यांनी राजकीय वेळ बरोबर साधली होती. उत्तर प्रदेशात त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपुर मधून त्यांच्यावर थेट हल्लाबोल केला होता.
प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशात आक्रमक होत आहेत हे दिसताच अखिलेश यादव हे देखील काँग्रेसवर तितक्याच जोरदारपणे हल्ला चढवताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसला शून्यवत करून ठेवले. बंगाल विधानसभेत काँग्रेसचे सध्या शून्य आमदार आहेत. उत्तर प्रदेशात ही त्यांची अशीच अवस्था होईल, असा दावा अखिलेश यादव यांनी करून ममता बॅनर्जी यांच्या राजकीय पावलावर पाऊल टाकले आहे.