विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लशीच्या किमती आणि पुरवठा याबाबत विरोधी पक्षीय सरकारे जनतेत संभ्रम पसरविण्याचे काम करत आहेत. अशा राजकारणामुळे देशव्यापी लसीकरणाच्या प्रक्रियेत अडथळे येतील. त्यामुळे विरोधकांनी असे काम करू नये असे आवाहन, भारतीय जनता पक्षाने आज केले. BJP request all parties to stop politics
भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, लसीकरणावरुन केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये मतभेद नाही. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.
सर्वांना लस मोफत देण्याची केंद्राची भूमिका आहे. देशामध्ये जेवढ्या लसीचे उत्पादन होते त्यापैकी केंद्र सरकार फक्त ५० टक्के कोटा स्वतःकडे ठेवतो आणि तोही राज्यांना मोफत देण्यात येतो. ४५ वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण मोहीम सध्या सुरू आहे.
१ मे नंतर अठरा वर्षांपुढील सर्व भारतीयांना लसीकरण केले जाईल. लसीकरण हा संवेदनशीलतेचा विषय आहे आणि ही वेळ आणीबाणीची आहे . त्यामुळे राजकारणासाठी राज्य आणि केंद्र असे वाद निर्माण करू नयेत. ज्या राज्यांनी मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली अशा उत्तर प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यांचे आभार केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्र लिहून मानले, असेही पात्रा यांनी नमूद केले.