विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपने 115 उमेदवारांची यादी जाहीर करून त्यामध्ये बॉलीवूड सुपरस्टार अभिनेत्री कंगना राणावत आणि रामायण मालिकेतील “श्रीराम” अरुण गोविल यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. कंगना राणावत हिला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून, तर अरुण गोविंद यांना उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा मतदारसंघातून भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. BJP releases 5th list of candidates for the upcoming Lok Sabha elections.
या खेरीज काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले उद्योगपती नवीन जिंदाल यांना हरियाणातील त्यांच्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून, तर झारखंडच्या सोरेन कुटुंबातून भाजपमध्ये दाखल झालेल्या सोरेन कुटुंबातल्या सुनबाई सीता सोरेन यांना झारखंड मधल्या दुमका मतदार संघातून भाजपने लोकसभेचे तिकीट दिले आहे. नवीन जिंदाल हे काँग्रेस कडून कुरुक्षेत्र मतदार संघातूनच दोन टर्म खासदार होते, तर सीता सोरेन या झारखंडमधून आमदार होत्या. या दोघांनीही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना त्या पाठोपाठ पक्षाने लोकसभेच्या मैदानात उतरविले आहे.
या खेरीज आंध्र प्रदेशातून एक हायप्रोफाईल उमेदवारी समोर आली असून आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष किरण कुमार रेड्डी यांना भाजपने राजमपेट लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. कर्नाटकातल्या उत्तर कन्नडा मतदारसंघात अनंत कुमार हेगडे यांचे तिकीट कापून भाजपने विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना तिकीट दिले आहे. बेळगाव मधून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना पक्षाने मैदानात उतरविले आहे.